* जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध ; अफवांमुळे पंपांवर गर्दी
जळगाव / प्रतिनिधी :- जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.
* इंधन पुरवठा सुरळीत :- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे कार्यरत आहे. संबंधित यंत्रणेमार्फत सातत्याने देखरेख ठेवली जात असून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झालेली नाही.
* अफवांमुळे निर्माण झालेली अनावश्यक गर्दी :- अप्रमाणित माहिती व सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत असून काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. प्रशासनाने ही परिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
* नागरिकांसाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना :- जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काही बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
- अप्रमाणित अफवा किंवा सोशल मीडियावरील चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये.
- भीतीपोटी इंधनाचा साठा करण्याचा प्रयत्न करू नये, पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी.
- इंधन पुरवठा सुरळीत असल्याबाबत प्रशासनावर विश्वास ठेवावा.
- अफवा पसरविणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याने असे प्रकार टाळावेत.
- कोणतीही माहिती अधिकृत शासकीय माध्यमांतूनच घ्यावी.
* अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा :- प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, चुकीची माहिती पसरविणे किंवा अफवा निर्माण करणे हा कायद्याने गुन्हा असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


Social Plugin