पनवेल / प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागृतीज फाउंडेशन, नाशिक शाखा - पनवेल यांच्या वतीने “कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्कार - 2026” सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात ओपन एज्युकेशन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अनिता तेलंगे यांना कर्तव्यदक्ष महिला सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन जागृतीज फाउंडेशनचे संस्थापक प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच पनवेल शाखेच्या अध्यक्षा गौरी क्षीरसागर आणि पूनम वाघमारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सन्मान प्राप्त झाल्यानंतर अनिता तेलंगे यांनी जागृतीज फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत हा सन्मान आपल्या कार्यासाठी नवी प्रेरणा देणारा असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमामुळे महिलांच्या कार्याचा गौरव होत असून समाजात महिलांच्या योगदानाची दखल घेण्याचा सकारात्मक संदेश दिला जात असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


Social Plugin