* कारवाईची मागणी तीव्र : धान्य वाटपात अनियमितता, पावत्या न देणे व लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचे आरोप
चाळीसगाव / प्रतिनिधी :- चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव गावातील रेशन दुकानातील गैरप्रकारांविरोधात ग्रामस्थांनी एकत्र येत संबंधित प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली असून तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मागण्या मान्य न झाल्याने तसेच रेशन दुकानदारावर कार्रवाई करण्यात न आल्याने ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरीसह दिलेल्या निवेदनामुळे हा प्रश्न गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे.
* धान्य वाटपात मोठ्या प्रमाणात अनियमितता :- तक्रारीनुसार, संबंधित रेशन दुकानदाराकडून शासनाकडून मिळणाऱ्या धान्याच्या वाटपात अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक लाभार्थ्यांना नियमानुसार धान्य मिळत नसल्याचे सांगण्यात आले आहे. काहींना 2 ते 3 महिन्यांपर्यंत धान्य दिले जात नसल्याचीही तक्रार आहे. गावातील काही कुटुंबांना पूर्णपणे वंचित ठेवले जात असल्याचेही समोर आले आहे.
* पावत्या न देणे व मनमानी कारभार :- तक्रारदारांनी नमूद केल्याप्रमाणे धान्य वितरणावेळी पावत्या दिल्या जात नाहीत. तसेच, वितरणाची कोणतीही स्पष्ट नोंद ठेवली जात नसल्याने पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. यामुळे लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
* नियमबाह्य पद्धतीने धान्य साठवण व विक्रीचा आरोप :- ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रेशन दुकानात धान्याचा साठा योग्य प्रकारे वितरित न करता इतरत्र वळविला जात असल्याचा संशय आहे. यामुळे गरजू कुटुंबांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत नाही.
* अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन :- या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, चाळीसगाव उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच स्थानिक आमदार यांच्याकडे तक्रार सादर केली आहे. निवेदनात संबंधित दुकानदाराविरोधात चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
* ग्रामस्थांची एकजूट ; शेकडो स्वाक्षऱ्या :- या तक्रारीसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्या केल्या असून, यामुळे हा प्रश्न संपूर्ण गावाचा असल्याचे दिसून येते. नागरिकांनी एकत्र येत आपला हक्काचा आवाज उठविल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. रेशन दुकानातील गैरप्रकार थांबवून लाभार्थ्यांना योग्य व नियमित धान्य मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Social Plugin