* नगरदेवळा-स्टेशन मार्गांवर अवैध प्रवासी वाहतूक बेकाबू
* क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी, मनमानी भाडे, दादागिरी
* पोलिस व आरटीओच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन या अवघ्या 4 ते 4.5 किमी अंतराच्या मार्गांवर सुरू असलेली अवैध व बेशिस्त प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे बेकाबू झाल्याचे चित्र समोर येत आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळणारी ही धोकादायक वाहतूक थांबवण्यासाठी पोलिस व आरटीओ विभाग नेमकी कधी कारवाई करणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.चाळीसगाव - जळगाव महामार्गांपासून नगरदेवळा गाव आत असल्याने नागरिकांना खासगी रिक्षा व वाहनांवर अवलंबून रहावे लागते. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही रिक्षा चालक प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट, कधी 12 ते 13 प्रवासी कोंबून वाहतूक करीत असल्याचे उघड झाले आहे. काही प्रवासी रिक्षेच्या मागे लटकवले जात असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
* 'नियम’ फक्त कागदावर, प्रत्यक्षात मोकळीकच :- काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर पोलिस व आरटीओने 7-8 प्रवासी मर्यादा निश्चित केली होती. तसेच हायवे परिसरात शिस्तबद्ध रिक्षा थांबे व बसस्टँड परिसरात नियंत्रण ठेवले गेले होते. मात्र सध्या ही संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे दिसत असून पुन्हा बेशिस्त, अवैध वाहतूक उघडपणे सुरू आहे.
* मनमानी भाडेवसुली, प्रवाशांची सर्रास लूट :- नगरदेवळा ते नगरदेवळा स्टेशन हायवेपर्यंत 10 रूपये तर रेल्वे स्टेशनपर्यंत 15 रूपये घेतले जातात. पण काही रिक्षा चालक प्रवाशांकडून 10 ते 15 रुपयांच्या नियमित भाड्याऐवजी 20 रुपये किंवा थेट 200 ते 300 रुपये ‘डायरेक्ट’ रिक्षासाठी मागितले जातात. मुळात बस स्टँडपर्यंत 100 व गावात घरपोच डायरेक्ट सेवा दिल्यास 150 रूपये होतात. सुट्टे पैसे नसल्यास किंवा ऑनलाईन पेमेंट करण्याचा प्रस्ताव दिल्यास नकार दिला जातो. यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासासह आर्थिक लूट सहन करावी लागत आहे.
* पहाटे व रात्री प्रवाशांना त्रास :- पहाटे 5 ते 7 दरम्यान मुंबई - पुण्याकडून येणाऱ्या प्रवाशांना अडवून जादा भाडे वसूल करण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीही स्टेशन ते गाव आणि गाव ते स्टेशन प्रवास करतांना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा प्रवाशांशी वाद, शिवीगाळ व दादागिरी होत असल्याच्या तक्रारी आहेत.
* ‘प्रवासी नाहीत’ म्हणून अर्ध्यावर उतरविणे :- मेमू गाडीच्या वेळेसही रिक्षा चालक मनमानी करीत असल्याचे समोर आले आहे. प्रवासी असतानाही “फक्त 1-2 प्रवासी आहेत” असे सांगत स्टेशनला हायवेवर उतरवून रेल्वे स्टेशनपर्यंत पायी पाठवले जाते. हे प्रकार प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारे आहेत.
* विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक :- शाळकरी मुले व विद्यार्थ्यांना देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रिक्षांमध्ये कोंबून नेले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात स्पष्ट नियम असतांनाही त्याचे खुलेआम उल्लंघन होत असून पोलिस व आरटीओ याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
* पुलावर कठडे नाहीत, खड्ड्यांमुळे वाढता धोका :- नगरदेवळा स्टेशन परिसरातील पुलावर कठडे नसणे व रस्त्यावर खड्डे पडलेले असताना 12-13 प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षा अपघाताला आमंत्रण देत आहेत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
* पोलिस- आरटीओची निष्क्रियता :- नगरदेवळा आऊट पौस्ट, पाचोरा पोलिस स्टेशन आणि आरटीओ विभाग यांना वारंवार तक्रारी देण्यात आल्या. पण प्रत्यक्ष कारवाई शून्य. “आमचे कुणीही काही करू शकत नाही” असा दम भरून प्रवाशांना गप्प बसवले जाते. पुलावर कठडे नसणे, खड्डे, ओव्हरलोडिंग, अतिरिक्त भाडे वसुली यापैकी एकाही मुद्द्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे या अवैध वाहतुकीमागे पोलिस व आरटीओचे साटेलोटे आहे का ? असा गंभीर संशय नागरिक व्यक्त करीत आहेत.
* आंदोलनाचा इशारा : उच्च अधिकाऱ्यांकडे धाव :- या सर्व प्रकारांना आळा न घातल्यास केपी न्यूज व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. लवकरच जळगाव पोलिस अधीक्षक, आरटीओ विभाग, अप्पर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव), पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी व संबंधित पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नगरदेवळा परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक हा केवळ वाहतूक नियमांचा प्रश्न नसून नागरिकांच्या जीविताशी निगडित गंभीर मुद्दा बनला आहे. प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करून नियमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच जाग येणार का ? हा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.


Social Plugin