* नर्मदा इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनाने शिक्षण क्षेत्रात नवे पर्व
* आ. किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात जागतिक दर्जाचे शिक्षण
पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नवे पर्व सुरू होत असून भडगाव रोडवरील अंतुर्ली फाट्याजवळ उभारण्यात आलेल्या ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’च्या प्रांगणावर येत्या रविवार, 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य ‘ज्ञानोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आमदार किशोर पाटील यांनी ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, नगरसेवक संजय गोहिल, प्रवीण ब्राह्मणे, वाल्मीक पाटील तसेच स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते.
* विकासातून शिक्षण क्षेत्रात गरुडझेप :- आमदार किशोर पाटील यांनी आपल्या गेल्या 14 - 15 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत नगराध्यक्ष ते आमदार या प्रवासात पाचोरा-भडगाव शहरांचा सर्वांगीण विकास साधला आहे. आता त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठी झेप घेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाची दारे खुली केली आहेत.
* ‘CBSE पॅटर्न’वर आधारित आधुनिक शाळा :- पत्रकार परिषदेत बोलतांना आमदार पाटील यांनी सांगितले की, समाजकारणाच्या ध्यासातून ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधा असलेली शाळा उभारण्याचा संकल्प त्यांनी केला होता. त्यातूनच ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’ची उभारणी करण्यात आली असून ही शाळा ‘CBSE पॅटर्न’वर आधारित आहे. प्रशस्त प्रांगण, निसर्गरम्य वातावरण, आधुनिक शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी ही शाळा लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.
* विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढाकार :- विद्यार्थी हा कुटुंब आणि देशाचा आधारस्तंभ असून त्यांच्या सुप्त गुणांचा विकास, उत्तम संस्कार, संस्कृतीची जोपासना आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडविणे हेच या शाळेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
या भव्य ज्ञानोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक भूषवणार आहेत. मुंबईचे उद्योजक संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.
पालकांना आवाहन :- पाचोरा, भडगाव तसेच तालुक्यातील पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘CBSE’ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुटुंबासह या ज्ञानोत्सव कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी केले आहे.
नर्मदा इंटरनॅशनल स्कूल हे पाचोरा-भडगाव परिसरातील शिक्षण क्षेत्रातील नवे पर्व ठरणार असून, ‘ज्ञानोत्सव’ सोहळा हा त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.


Social Plugin