* जम्मूतील ‘महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड’ सोहळ्यात वक्तव्य
* प्रधानमंत्री मोदींची विकासाची गाडी कोणी अडवू शकत नाही
जम्मू / प्रतिनिधी :- पाकिस्तानने अतिरेक्यांना आश्रय देणे थांबवून आतंकवादाचा पूर्णतः नायनाट केला तरच भारत-पाकिस्तान मैत्रीबाबत चर्चा होऊ शकते. मात्र पाकिस्तानची अशी कोणतीही इच्छा दिसत नाही. अतिरेक्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानशी भारताची मैत्री कधीही होणार नाही, असे ठाम प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
जम्मू येथील आमंत्रण रिसॉर्ट हॉलमध्ये आयोजित ‘महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड’ सोहळ्यात ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात माजी राज्यपाल व भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्यासह अनेक मान्यवरांना ना. रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक व रिपाइं जम्मू-काश्मीर प्रदेश अध्यक्षा संध्या गुप्ता तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
* आतंकवाद संपविल्याशिवाय मैत्री शक्य नाही :- याप्रसंगी बोलताना रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करतांना सांगितले की, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आग्रा येथे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्टपणे सांगितले होते की, पाकिस्तानने आतंकवादी कारवाया थांबवल्या तरच दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊ शकतात. मात्र त्या वेळीही पाकिस्तानने आतंकवाद रोखण्यास नकार दिला होता. त्यामुळे पाकिस्तानला भारताशी मैत्री करण्याची खरी इच्छा नसल्याचे स्पष्ट होते, असे आठवले यांनी नमूद केले.
* शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा गौरव :- या सोहळ्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या बीएसएफ आणि सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा महाराजा हरिसिंह डोगरा अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला. तसेच 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी अनेकांचे प्राण वाचविणारे पोलिस सब-इन्स्पेक्टर मंगेश नाईक यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
* किरण बेदींच्या कार्याची आठवण :- माजी राज्यपाल आणि भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या शिस्तप्रिय कार्याची आठवण सांगताना रामदास आठवले म्हणाले की, दिल्लीत आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असतांना त्यांनी शिस्तीच्या बाबतीत कोणालाही सवलत दिली नाही. त्या काळात त्यांनी नियमभंग केल्यामुळे तत्कालीन पंतप्रधानांची गाडीही जप्त करून कारवाई केली होती.
* मोदींच्या विकासाच्या वाटचालीचा उल्लेख :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. मोदींची विकासाची गाडी कोणीही अडवू शकत नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
* कलम 370 हटवल्यानंतर शांततेत वाढ :- जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर येथे पोलिस आणि सुरक्षा दलांना अधिक अधिकार मिळाले असून परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक शांततापूर्ण होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातून पूर्णपणे आतंकवाद संपविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांना गौरविण्यात आले असून देशभक्ती, सुरक्षा आणि विकास यांवर आधारित संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.


Social Plugin