Type Here to Get Search Results !

नडोदे गावात बेकायदेशीर सुरुंग प्रकरण उघड

* ग्रामस्थांची प्रशासनाकडे तक्रार : डोंगर उत्खननामुळे पर्यावरण व जीवितास धोका

* शाळा - वस्तीपासून अवघ्या 200 मीटरवर स्फोट, तात्काळ कारवाईची मागणी

खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील नडोदे गावात बेकायदेशीररित्या सुरुंग लावून डोंगराचे उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रायगड तसेच तहसीलदार खालापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करीत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. मुंबई - पुणे महामार्गांजवळ वसलेले नडोदे गाव निसर्गरम्य असून अलीकडच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात जमीनविक्री व विकासकामे सुरू आहेत. मात्र, या विकासाच्या नावाखाली काही भू-माफियांनी डोंगराचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू केले असून त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

* सुरुंग लावण्याचा प्रकार, वेळांसह नोंद :- ग्रामस्थांच्या माहितीनुसार, मौजे नडोदे येथील सर्व्हे क्रमांक 1/1, 1/2 आणि 3/2 या क्षेत्रात 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.20, 2.25 आणि 2.30 वाजता तीन वेळा सुरुंग लावण्यात आले. तसेच हा प्रकार केवळ एकदाच नव्हे, तर दररोज सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.


* पर्यावरण व जीवितास गंभीर धोका :- गावाच्या हद्दीत दगड फोडण्यासाठी सुरुंग लावणे हे कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. या स्फोटांमुळे ध्वनी प्रदूषण व वायु प्रदूषण, भूकंपासारखे धक्के, जमिनीची हानी, नागरिकांच्या जीवितास धोका असे गंभीर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.


* शाळा व वस्तीच्या जवळ स्फोट :- सुरुंग लावण्यात येणाऱ्या ठिकाणापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर शाळा, पाण्याच्या टाक्या आणि निवासी वस्ती आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


* ‘भू-माफियांचा दबाव’; नियमांची पायमल्ली :- काही धनिक व्यक्ती राजकीय व आर्थिक बळाचा वापर करून नियमांचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष किंवा संगनमत आहे का ?  असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.


* प्रशासनाकडे तक्रार, कठोर कारवाईची मागणी :- या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या तक्रारीची प्रत पोलिस अधीक्षक रायगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खालापूर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती खालापूर, ग्रामपंचायत नडोदे तसेच खाण अधिकारी रायगड यांना पाठविण्यात आली आहे.


नडोदे गावातील बेकायदेशीर सुरुंग प्रकरण हे केवळ पर्यावरणीय मुद्दा नसून नागरिकांच्या जीविताशी निगडित गंभीर समस्या बनली आहे. वेळेत कारवाई न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement