* जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी
* मार्गदर्शन व सत्कार अन् महिलांच्या सशक्तीकरणाचा सामाजिक संकल्प
खोपोली (रायगड) / दिनकर भुजबळ :- समाजाच्या प्रगतीचा कणा असलेल्या महिलांच्या सन्मानासोबत त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने खोपोली येथे एक स्तुत्य उपक्रम उत्साहात पार पडला. नागरी सामाजिक विकास संस्था, रायगड आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांचा सन्मान व आरोग्य जागरूकता कार्यक्रम” आयोजित करण्यात आला.
* आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ :- या कार्यक्रमात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आरोग्यविषयक सविस्तर मार्गदर्शन व प्रभावी व्याख्याने घेण्यात आली. महिलांना आपल्या आरोग्याबाबत सजग राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
* तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले :- कार्यक्रमाला खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉं. संगीता वानखेडे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर माधवबाग ओपीडी प्रमुख डॉं. श्रद्धा सातपुते यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक समृद्ध व प्रेरणादायी ठरला.
* कर्तृत्ववान महिलांचा सन्मान :- या उपक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करून इतर महिलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
* स्वतःसाठी वेळ काढा - वर्षा मोरे :- नागरी सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका वर्षा मोरे यांनी आपल्या मनोगतात महिलांना “स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या आरोग्याकडे सजगपणे लक्ष द्या” असा मोलाचा संदेश दिला. हा संदेश उपस्थित महिलांच्या मनाला भिडणारा ठरला.
या कार्यक्रमाला स्थानिक महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत, अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी अत्यंत आवश्यक व प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.


Social Plugin