* प्रेरणादायी स्त्रीशक्तीचा गौरव : अमेरिका-भारतामधील कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकथा एकत्र ; विले पार्ले येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबई / प्रतिनिधी :- विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अमेरिका व भारतातील स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवनकथांचा संग्रह असलेले लेखिका चित्रा मेहेंदळे यांचे ‘जिचं तिचं आकाश’ हे पुस्तक नुकतेच विले पार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या सभागृहात शानदार वातावरणात प्रकाशित करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्ती बागेश्री पारख, अभिनेत्री सुप्रिया सचिन पिळगावकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर तसेच नगरसेविका अंजली सामंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी भूषविले.
* प्रेरणादायी स्त्रियांच्या संघर्षकथा :- 'जिचं तिचं आकाश’ या पुस्तकात अमेरिका आणि भारतातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचे चित्रण करण्यात आले आहे. प्रत्येक कथा ही संघर्ष, जिद्द आणि यशाचा प्रवास मांडणारी असल्याने हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी समयोचित मनोगते व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलतांना अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी पुस्तकातील काही कथांमधील नायिकांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेत, हे पुस्तक आजच्या युवक-युवतींसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले.
* लेखिकेने उलगडली पुस्तकामागची प्रेरणा :- कार्यक्रमाच्या प्रारंभी लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी सर्वांचे स्वागत करून पुस्तक निर्मितीमागील प्रेरणा, अनुभव आणि कथांची जडणघडण याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका भुजबळ यांनी प्रभावीपणे केले, तर आभार देवेंद्र भुजबळ यांनी मानले.
* स्त्रीशक्तीचा अनोखा मिलाफ :- या पुस्तकाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील सर्व कथा नायिका, लेखिका, प्रकाशिका तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा या सर्व महिला आहेत. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम स्त्रीशक्तीचा सशक्त संदेश देणारा ठरला आहे. हे पुस्तक ग्रंथाली संस्थेने तयार केले असून ‘न्यूज स्टोरी टुडे’तर्फे त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin