* दोन चिमुकली मुले पोरकी : चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर हादरले
* आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू
चाळीसगाव / प्रतिनिधी :- तालुक्यातील शिवापूर येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून एका दाम्पत्याने एकाच झाडाला, एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
भगवान पोपट जाधव (वय 38) आणि आशाबाई भगवान जाधव (वय 27) असे मृत दाम्पत्याचे नाव असून ते शिवापूर शिवारातील आपल्या शेतात वास्तव्यास होते. भगवान जाधव हे शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास त्यांनी घराजवळील उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सकाळी नातेवाईक नेहमीप्रमाणे शेतात गेले असता हे दोघे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. ही घटना लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली. तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉंक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दाम्पत्यामागे एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुले असून ती सध्या शिक्षणासाठी बाहेरगावी राहत आहेत. आई-वडिलांच्या या टोकाच्या निर्णयामुळे या दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ते पोरके झाले आहेत. त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती वाद, आर्थिक अडचणी किंवा इतर कोणते कारण याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment
0 Comments