* कथित व्हिडीओ व्हायरल, राजकारणात खळबळ
* तृतीयपंथी व्यक्तीसोबत असल्याचा दावा, विरोधक आक्रमक
* राजीनाम्याची मागणी तीव्र, लवकर निर्णय होण्याची शक्यता
मुंबई / प्रतिनिधी :- राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वातावरण तापले आहे. संबंधित व्हिडीओमध्ये झिरवळ यांच्यासोबत एका तृतीयपंथी व्यक्तीची उपस्थिती असल्याचा दावा संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
शुक्रवारी अचानक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभर चर्चेला उधाण आले. विविध राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत झिरवळ यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. त्यांनी म्हटले, हा प्रकार केवळ एक व्हिडीओ नसून राज्यातील नैतिक अधःपतनाचे उदाहरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
राजकीय दबाव वाढत असल्याने झिरवळ राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत सरकार किंवा पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे समोर आले. त्यांच्या कार्यालयाकडूनही “अशा कोणत्याही व्हिडीओची माहिती नाही” असे सांगण्यात आले आहे.
झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री असले तरी पक्षाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी “व्हिडीओ पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ” असे सांगत सावध भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे. व्हायरल व्हिडीओमागील वास्तव काय, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


Social Plugin