* नगरदेवळ्यातील ग्रामस्थांची आर्त हाक
* जीवनदायिनी नदी घाणीच्या विळख्यात
* गाळ, कचरा, झुडपांमुळे प्रवाह ठप्प
* स्वच्छता, खोलीकरण, संरक्षण भिंतीसह सर्वांगीण विकासाची मागणी
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावाच्या अस्तित्वाशी, विकासाशी आणि भविष्यासोबत घट्ट नाते असलेली अग्नावंती नदी आज घाणीच्या, गाळाच्या आणि काटेरी झाडेझुडपांच्या विळख्यात अडकून अक्षरशः मरणयातना भोगत आहे. गावाची जीवनवाहिनी असलेली ही नदी आज अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांना “अग्नावंती नदी दत्तक घ्या” अशी आर्त आणि ठाम मागणी केली आहे.
अग्नावंती धरणापासून ते संगमेश्वर येथील संगमापर्यंत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. काटेरी झुडपे, प्लास्टिक कचरा आणि घाणीमुळे अनेक ठिकाणी नदीचा प्रवाह अडलेला आहे. ऐतिहासिक ब्रिटीशकालीन बंधाऱ्यापासून बाजारातील लहान व मोठ्या फरशीपर्यंत नदीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काही ठिकाणी तर नदी अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो.
पाटबंधारे विभाग, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी अशा सर्वच स्तरावर या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. 2025 च्या मान्सूनपूर्वी नदीपात्रातील गाळ काढणे, काटेरी झाडेझुडपे तोडणे आणि खोलीकरण करणे आवश्यक होते. मात्र, हे काम वेळेत न झाल्यामुळे 2025 च्या पावसाळ्यात नदीला पूर आला आणि बाजारपेठेत आठवडाभर पाणी साचल्याची घटना घडली होती. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, योग्य वेळी नदी स्वच्छ केली असती, तर ही परिस्थिती टाळता आली असती.
नगरदेवळ्याचे पिण्याचे पाणी, शेती, केळी उत्पादन आणि स्थानिक उद्योगधंदे पूर्णतः अग्नावंती नदीवर अवलंबून आहेत. मात्र नदीतील घाणीमुळे आता दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. शेतीपर्यंत पोहोचणारे पाणीही अडथळ्यांमुळे विस्कळीत होत असून, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे.
गेल्या काही महिन्यांत राजकारणात सक्रिय झालेल्या भाजप नेते प्रणय ऊर्फ मुन्ना भांडारकर यांनी स्वखर्चातून टाकळी रस्ता, नगरदेवळा सिम रस्ता यांसारखी कामे पूर्ण केल्याचे ग्रामस्थ सांगतात. माजी उपसरपंच विलास भामरे, आदित्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य परदेशी, कडू नाना पाटील, सुनील शेलार, स्वप्नील चौधरी, विलास सोनवणे आदींनी सांगितले की, “भांडारकर यांच्याकडे गेलेले काम आजवर अपूर्ण राहिलेले नाही.” याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तरी भाजप नेते मुन्ना भाऊ भांडारकर यांनी नदीपात्रातील गाळ काढणे व खोलीकरण करणे, काटेरी झाडेझुडपे व कचरा हटविणे, नदीकाठावर संरक्षण भिंती उभारणे, ऐतिहासिक बंधाऱ्यावर स्वयंचलित लोखंडी दरवाजा बसविणे, ब्रिटीशकालीन बंधारा परिसर व मोठी फरशी ते गुरांच्या मार्केटपर्यंत घाट बांधकाम, नदीकाठ सौंदर्यीकरण व चौपाटींचा विकास करणे, नियमित स्वच्छता मोहिमा व जनजागृती देखील राबविण्यात यावी, अशी मागणी नगरदेवळा ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या मते, योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केल्यास अग्नावंती नदी ही केवळ पूरनियंत्रणासाठीच नव्हे, तर पर्यटन, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचे केंद्र बनू शकते. “नदी ही आई आहे” असे म्हणणारे हात जोडतात, पूजा करतात, पण प्रत्यक्ष कृतीत मात्र तिची हेळसांड करतात हे दुटप्पी धोरण आता ग्रामस्थांना मान्य नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नव्हे, तर पुढील पिढ्यांचा विचार करून निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी होत आहे.




Social Plugin