* रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर नवे नेतृत्व कोण ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जळगाव / फिरोज पिंजारी :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला आघाडीत मोठी राजकीय घडामोड घडली असून प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर खान्देशकन्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित छायाचित्रांमुळे रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. विरोधकांनी तीव्र टीका केल्यानंतर त्यांच्यावर नैतिक दबाव वाढत गेला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
चाकणकर यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट करतांना सांगितले की, अशोक खरातच्या कोणत्याही गैरकृत्याशी माझा दूरान्वये संबंध नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे व निराधार आहेत. सत्य लवकरच समोर येईल. तसेच या प्रकरणाची चौकशी पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही नमूद केले.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असली तरी जळगावमधील प्रतिभा शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर 'त्या' सध्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहत आहेत. लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी हक्कांसाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्रात लढा उभारला असून एक लढवय्यी व प्रभावी नेत्या म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून या प्रकरणाचे आणखी पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर प्रतिभा शिंदे यांची निवड झाली, तर खान्देशातील महिला नेतृत्वाला राज्य पातळीवर मोठी संधी मिळेल, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


Post a Comment
0 Comments