* काकड आरती, महापूजा, कीर्तन व महाप्रसादाने गावात भक्तिरसाचा दरवळ
खालापूर / सुधीर माने :- खालापूर तालुक्यातील निंबोडे गावात सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. धार्मिक परंपरा आणि शिस्तीचे पालन करणाऱ्या या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थ, महिला आणि तरुणांनी एकत्र येत हा सोहळा उत्साहात साजरा केला.
गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी पहाटे 4 ते 6 वाजता मुक्ताबाई महिला मंडळ आणि श्रीराम नवतरुण मंडळ यांच्या वतीने काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला. सकाळी 7 ते 7.30 दरम्यान माजी उपसभापती उमेश गावंड व डॉं. चेतना उमेश गावंड तसेच खालापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोशना मोडवे यांच्या हस्ते कळसपूजन करण्यात आले. यानंतर सकाळी 7 ते 8 वाजता श्रीराम प्रभूची महापूजा खालापूर येथील उद्योजक महेश राठी आणि उपनगराध्यक्ष किशोर पवार यांच्या हस्ते संपन्न झाली.
यानंतर आदरणीय दिलीप महाराज राणे (हलीवली, कर्जत) यांनी श्रीराम जन्माचे कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि वातावरण अधिक भक्तिमय झाले. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद उमेश गावंड यांच्या सौजन्याने देण्यात आला. मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. हा संपूर्ण सोहळा गुरुवर्य दादा महाराज राणे यांच्या कृपाशीर्वादाने आणि हभप दिलीप महाराज राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.


Post a Comment
0 Comments