Type Here to Get Search Results !

‘उत्सव महिला दिनाचा - सन्मान स्त्री जन्माचा’ सोहळा उत्साहात संपन्न

* दिशा महाराष्ट्राचीचा भव्य उपक्रम : 55 कर्तृत्ववान महिलांचा गौरव, पारमी पवारचा दुहेरी राज्यस्तरीय सन्मान

मुंबई / रामदास धो. गमरे :- दिशा महाराष्ट्राची या युट्यूब वाहिनीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेला ‘उत्सव महिला दिनाचा - सन्मान स्त्री जन्माचा’ हा राज्यस्तरीय गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तसेच वाहिनीचे मुख्य संपादक तुषार गौतम नेरवेकर यांच्या ज्येष्ठ कन्या भार्गवी तुषार नेरवेकर हिच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. हा चौथा सन्मान सोहळा रविवार, 15 मार्च 2026 रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर समता भवन, जुईनगर (नवी मुंबई) येथे मुख्याध्यापिका अर्चना मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न झाला.

* 55 कर्तृत्ववान महिलांचा राज्यस्तरीय सन्मान :- या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 55 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना व्यासपीठ देत त्यांचा गौरव करण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला.


* सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत :- मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन श्रीतेज नेवरेकर आणि सपना नेवरेकर यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमात स्त्री जीवनावर आधारित “ती” या कवितेचे हृदयस्पर्शी सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण सभागृह भावूक झाले. त्यानंतर मिमिक्री, नृत्य, गायन अशा विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमाला रंगत आणली.


या कार्यक्रमास साधना बोत्रे, अर्चना मोहिते, ॲंड. पूजा कांबळे, मनीषा शिरटावले, डॉं. पौर्णिमा सोनकांबळे, आत्माराम चव्हाण, तेजस बोरघरे, चंद्रकांत जगताप, अर्चना भोर-करंडे, सीमा खंडागळे-लोंढे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.


* पारमी पवारचा दुहेरी सन्मान ठरला आकर्षण :- 'सावित्रीबाई फुले आदर्श कन्या पुरस्कार 2026’ प्रदान याच सोहळ्यात गुहागर तालुक्यातील तळवली गावची सुप्रसिद्ध निवेदिका पारमी दिपाली रवींद्र पवार हिला ‘सावित्रीबाई फुले आदर्श कन्या पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मनीषा शिरटावले यांच्या हस्ते देण्यात आला.


* नृत्य क्षेत्रातही राज्यस्तरीय यश :- पारमी पवार हिला कला-सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट नृत्य सादरीकरणासाठी राज्यस्तरीय नृत्य पुरस्कार देखील ॲंड. पूजा कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


* गुहागरच्या सुकन्येचा गौरव :- पारमी ही गुहागर तालुक्यातील सुप्रसिद्ध नाटककार व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र अनंत पवार यांची कन्या असून तिने अल्पावधीतच कला व निवेदन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन राज्यस्तरीय पुरस्कार पटकावत तिने आपल्या यशाचा ठसा उमटविला असून तिच्या या कामगिरीमुळे गुहागर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


* महिला सक्षमीकरणाचा संदेश :- दिशा महाराष्ट्राची या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करीत समाजात महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल अखेरीस तुषार गौतम नेरवेकर यांनी सर्वांचे आभार मानले. हा भव्य सोहळा महिलांच्या कर्तृत्वाचा उत्सव ठरला असून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement