Type Here to Get Search Results !

मातंग समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण मागे

* आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते सांगता : शासन दरबारी मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन

मुंबई / प्रतिनिधी :- मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटना आणि मागासवर्गीय वंचित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाची सांगता अखेर आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते करण्यात आली. शासन दरबारी मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. हे उपोषण तब्बल आठ दिवस सुरू होते. या आंदोलनात मोहन कांबळे, राजीव मानकर, प्रकाश चव्हाण, अनिल साठे आणि मोहन साठे यांनी सक्रिय सहभाग घेत उपोषण केले. अखेर सरकारने या आंदोलनाची दखल घेत चर्चा सुरू केली.

* मंत्री व आमदारांनी घेतली दखल :- उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, आमदार सत्यजीत देशमुख आणि आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनाची दखल घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच विरोधी पक्षातील नेते शशिकांत शिंदे, जयंत पाटील, सचिन अहिर, भाई जगताप, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, संत फलाहार महाराज तसेच भारतीय मराठा महासंघ यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.


* महत्त्वाच्या मागण्यांबाबत आश्वासन :- आमदार अमित गोरखे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले. त्यामध्ये मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, चिराग नगर परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला जाईल, वाटेगाव स्मारकासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मागासवर्गीय आयोगावर अपंग सदस्य नेमण्याची हमी, अत्याचारित कुटुंबांना संरक्षण देण्यासाठी उपाययोजना, शेगाव लहुजी नगर व संजय गांधी उद्यान झोपडीप्रश्न वैयक्तिक पातळीवर हाताळण्याचे आश्वासन, आर्टी (ARTI) चे मुंबई व पुणे येथे दोन प्रादेशिक कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव या मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी ठाणे येथे क्रांतिपिता लहुजी साळवे यांच्या पुतळ्याबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात आली.


* आमदारांच्या हस्ते उपोषणाची सांगता :- आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन दिल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी उपोषणकर्त्यांना पाणी पाजून उपोषणाची सांगता केली. या आंदोलनाला राज्यभरातून शेकडो समाजबांधवांनी भेट देत पाठिंबा दिला आणि आंदोलनकर्त्यांचे मनोबल वाढवले. या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.


* न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच :- यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, मातंग समाजाच्या न्याय्य मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील. या आंदोलनात गजानन वानखेडे, अनिल सुरळकर, सुनील भालेराव, दिलीप यादव, समाधान सावळे, गणेश तांबे, भारत बिऱ्हाडे, संतोष सुरळकर, सुनील सुरळकर, रवी शिरसाठ, संजय कांबळे, अरुण कांबळे, हरीश दांडगे, सीताबाई चांदणे, अनिता सोनवणे, पूनम सावळे, रविनाताई वाघ, मालतीताई दोडके तसेच राज्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या आंदोलनाचे नेतृत्व संघटना नेते रमेश भिकू दोडके यांनी केले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement