* पारंपरिक विधींचे अध्यात्मिक महत्त्व : अभ्यंगस्नान ते गुढी उभारणीपर्यंत सण साजरा करण्याचे शास्त्र ; सात्त्विकतेने दिवस साजरा करण्याचे आवाहन
खालापूर / सुधीर देशमुख :- हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शविणारा गुढीपाडवा हा सण धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक सणाप्रमाणे या दिवशीही काही पारंपरिक धार्मिक कृती केल्या जातात. या कृतींमागील अध्यात्मशास्त्र समजून घेतल्यास त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. सनातन संस्थेद्वारे संकलित माहितीच्या आधारे गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या प्रमुख धार्मिक विधींचा आढावा पुढीलप्रमाणे आहे.
* अभ्यंगस्नानाने दिवसाची मंगल सुरुवात :- गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) करणे शास्त्रात सांगितले आहे. स्नान करतांना देशकालकथन करून दिवसाची शुभ सुरुवात केली जाते.
* तोरण लावण्याची परंपरा :- स्नानानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लाल फुलांसह बांधले जाते. लाल रंग हा शुभतेचे प्रतीक मानला जात असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे.
* देवपूजा आणि वर्षप्रतिपदा शांती :- या दिवशी नित्य देवपूजेसह ‘वर्षप्रतिपदा शांती’ करण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम ब्रह्मदेवाची पूजा केली जाते, कारण या दिवशी त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. त्यानंतर होमहवन, ब्राह्मणसंतर्पण आणि विष्णू पूजन केले जाते. 'नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः’ हा मंत्र म्हणत भगवान विष्णूची आराधना केली जाते. ही पूजा केल्याने पापांचा नाश होतो, आयुष्य वाढते आणि धन-धान्याची समृद्धी मिळते, असे शास्त्र सांगते.
* गुढी उभारणीचे शास्त्र :- गुढीपाडव्याचा मुख्य विधी म्हणजे गुढी उभारणे. सूर्योदयानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला गुढी उभारली जाते. गुढी विजय, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. सूर्यास्तावेळी गुळाचा नैवेद्य दाखवून गुढी उतरवली जाते.
* दानधर्माचे महत्त्व :- या दिवशी याचकांना दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. पाणपोईद्वारे उदकदान केल्याने पितर संतुष्ट होतात. धर्मशिक्षण देणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे.
* पंचांग श्रवण व कडुनिंबाचा प्रसाद :- गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग श्रवण केले जाते. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या श्रवणाने जीवनात शुभ फल प्राप्त होते. त्यानंतर कडुनिंब, जिरे, हिंग, भिजलेली चण्याची डाळ आणि मध यांचा प्रसाद दिला जातो.
* शेतीसाठी शुभ दिवस :- या दिवशी भूमी नांगरण्याची प्रथा आहे. मातीतील सूक्ष्म कणांवर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन पीक उत्पादनाची क्षमता वाढते, असे मानले जाते. शेतकरी या दिवशी शेतीची साधने आणि बैल यांची पूजा करतात.
* सात्त्विक जीवनशैलीचा संदेश :- गुढीपाडवा हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून ‘अधिकाधिक चैतन्य मिळवण्याचा दिवस’ मानला जातो. सात्त्विक अन्न, पोशाख आणि धार्मिक आचरण याला प्राधान्य दिले जाते. नवीन किंवा रेशमी वस्त्रे परिधान केल्याने देवतांचे आशिर्वाद लाभतात, असे मानले जाते.
* ईश्वरप्रार्थनेने दिवसाची सांगता :- या दिवशी ईश्वरचरणी “हे ईश्वर, तुझ्या कृपेने येणाऱ्या सात्त्विक लहरी मला ग्रहण करता येऊ देत,” अशी भावपूर्ण प्रार्थना केली जाते. गुढीपाडवा हा सण केवळ परंपरा नाही, तर आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे. त्यामुळे या दिवशी धार्मिक कृती शास्त्रशुद्ध पद्धतीने करून नववर्षाची सुरुवात सकारात्मक आणि मंगलमय करण्याचे आवाहन करण्यात येते.


Social Plugin