* सामान्य घरातून उभा राहिलेला असामान्य समाजसेवक
* पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि प्रशासनाशी समन्वयातून घडलेली प्रेरणादायी वाटचाल
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीकाठी वसलेले छोटेसे कपिलेश्वर गाव…याच मातीमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या सागर शेळके या तरुणाने संघर्ष, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजकार्य, पत्रकारिता आणि संघटनात्मक नेतृत्व यांची प्रभावी वाटचाल घडवली. आज ते अनेक सामाजिक संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असून “सामान्य घरातूनही असामान्य नेतृत्व घडू शकते” हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.
* नोकरीसोबत समाजसेवेची धडपड :- सागर शेळके हे महानगर गॅस लिमिटेड, मुंबई येथे गेली 16 वर्षे निष्ठेने सेवा बजावत आहेत. मात्र नोकरीच्या जबाबदाऱ्यांसोबतच समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे त्यांनी सामाजिक कार्याला स्वतःला झोकून दिले आहे. कोणीही गरजू व्यक्ती रात्री-अपरात्री मदतीसाठी फोन केला तरी सागर शेळके तत्काळ धावून जातात. एखाद्या व्यक्तीसमोर कितीही मोठी समस्या असली तरी ती सोडविण्यासाठी ते स्वतःच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतात. त्यांच्या या मदतीच्या स्वभावामुळेच अनेक मित्र आणि सहकारी आपोआप त्यांच्या कार्याशी जोडले गेले.
* अनेक संस्थांमध्ये जबाबदारीची धुरा :- सागर शेळके सध्या विविध सामाजिक व पत्रकार संघटनांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय पोलीस मित्र संस्था - महाराष्ट्र राज्य प्रमुख, योगदान पोर्टल न्यूज व निकाल न्यूज - संपादक, भारतीय ग्रामीण पत्रकार संघ - महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, द युवा ग्रामीण पत्रकार संघ - कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष (माजी), अवयवदान - देहदान पर्व शैक्षणिक संस्था - कोल्हापूर प्रमुख, लायन ग्रुप ऑफ महाराष्ट्र - राज्य उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते कार्यरत आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
* ग्रामीण पत्रकारांचा बुलंद आवाज :- सागर शेळके यांनी पत्रकार संघटनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांचे मजबूत जाळे उभे केले आहे. खेड्यापाड्यातील पत्रकारांना एकत्र आणत त्यांनी ग्रामीण समस्यांना आपल्या प्रसार माध्यमांमधून आवाज दिला. गावोगावी सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी पत्रकारितेला समाजहिताचे स्वरूप दिले. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
* अवयवदान - देहदान जनजागृतीचा ध्यास :- सागर शेळके यांनी अवयवदान आणि देहदान जनजागृती हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना मरणोत्तर अवयवदानासाठी प्रेरित करीत त्यांनी समाजात एक सकारात्मक संदेश दिला. याशिवाय रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत, आपत्तीग्रस्तांना सहाय्य, युवक सक्षमीकरण, महिलांसाठी जनजागृती कार्यक्रम असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.
* विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात :- राष्ट्रीय पोलीस मित्र संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकदा आश्रमशाळा व अंधशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळे, कपडे आणि वह्या वाटप केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. महिलांना समाजकार्य आणि नेतृत्वासाठी प्रोत्साहन देणारे कार्यक्रमही त्यांनी आयोजित केले आहेत.
* गरजूंसाठी सदैव तत्पर :- सागर शेळके यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची मानवी संवेदनशीलता. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास ते तात्काळ रक्तदात्यांची व्यवस्था करून देतात. वृद्ध, अपंग आणि गरजू व्यक्तींना शक्य तितकी मदत करणे हे त्यांचे ध्येयच बनले आहे. संत तुकाराम महाराजांच्या “जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले” या वचनाप्रमाणे ते पीडित आणि वंचित घटकांसाठी काम करीत आले आहेत.
* साधेपणात मोठेपण :- मुंबईत नोकरी करीत असतानाही सागर शेळके यांनी आपल्या मूळ गावाशी असलेले नाते कधीही विसरले नाही. कपिलेश्वर गावातील शेतकरी, सैनिक, सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्याशी असलेली त्यांची नाळ आजही घट्ट आहे. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे असले तरी त्यांच्या कार्याचा विस्तार मात्र मोठा आहे. सागर शेळके यांच्या शब्दाला मान देणारे बरेच उच्च पदस्थ अधिकारी आहेत. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. एक ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता आपल्या सामाजिक कार्याने एका उच्च स्थानावर पोहोचल्याचे दिसून येते. सागर शेळके यांचे राहणीमान साध्या पद्धतीचे आहे. परंतु सामाजिक कार्य मात्र उच्च स्थानावर आहे. "वेश असावा बावळा, परी अंगी नाना काळा" ही उक्ती सागर शेळके यांना तंतोतंत लागू पडते. दिसायला साधे जरी असले तरी अनेक क्षेत्रात त्यांचे कार्य विस्तारले आहे, हे नाकारता येत नाही.
* तरुणांसाठी प्रेरणास्थान :- आज सागर शेळके हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. संघर्षातून उभे राहून समाजासाठी काम करण्याची जिद्द त्यांनी दाखवून दिली आहे. मातीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेणाऱ्या या तरुण समाजसेवकाची वाटचाल पाहतांना एक गोष्ट स्पष्ट होते की, “सामान्य घरातूनही असामान्य नेतृत्व घडते.” समाजासाठी झटणाऱ्या या कार्यकर्त्याचा सामाजिक प्रवास असाच तेजाने उजळत राहो, हीच सर्वांची अपेक्षा.
- शब्दांकन : नारायण लोहार (पत्रकार, तरुण भारत)


Social Plugin