* नमाज, बंधुभाव आणि एकतेचा सुंदर संगम
* ३० दिवसांच्या रोजानंतर सामूहिक नमाज
* हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पवित्र रमजान महिन्यातील 30 दिवसांचे कठोर रोजे, तरावीहची नमाज आणि उपासनेनंतर नगरदेवळा येथे शनिवार, 21 मार्च 2026 रोजी ईद-उल-फितरचा सण पारंपरिक पद्धतीने आणि धार्मिक रितीरिवाजांनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नगरदेवळा कब्रस्थान परिसरातील ईदगाह मैदानात सकाळी सामूहिक नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी अल्लाहचे आभार मानले.
सकाळी 8 वाजता नगरदेवळा येथील जुम्मा मस्जिद परिसरात सर्व मुस्लिम बांधव एकत्र जमले. शांततेत अल्लाहची हम्दो-सना, दुरूद आणि सलाम पठण करीत शिस्तबद्ध पद्धतीने ईदगाह मैदानाकडे प्रस्थान करण्यात आले. सकाळी 8.30 वाजता ईदगाह मैदानात सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर देशात शांतता, प्रगती आणि समाजात सौहार्द टिकून रहावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत गळाभेट घेतली. गावात सर्वत्र आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ईदच्या निमित्ताने अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना भेट देत शुभेच्छा दिल्या. यामुळे नगरदेवळा येथे सामाजिक एकात्मतेचे आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. शिवसेना नेते व जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील तसेच भाजप नेते प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ईदगाह येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त घरोघरी शिरखुर्मा, सेवई आणि विविध गोड पदार्थांची मेजवानी होती. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यात भेटीगाठी होत सणाचा आनंद द्विगुणित झाला. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी नवीन कपडे परिधान करून ईद साजरी केली. विशेषतः मुलांमध्ये सणाचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून आला. सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरदेवळा औट पोस्ट पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Social Plugin