* अतिक्रमण हटाव मोहिमेत मोठी कारवाई
* अतिक्रमणमुक्त शहराकडे ठोस पाऊल
* पोलिस बंदोबस्तात आक्रमक कारवाई
* मुख्य चौक, बसस्टँड परिसरातील टपऱ्या जमीनदोस्त
* नागरिकांकडून स्वागत, काही ठिकाणी चर्चांना उधाण
खोपोली / दिनकर भुजबळ :- खोपोली शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अखेर नगर परिषदेने कठोर कारवाई करीत 'अतिक्रमण हटाव' मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे. मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणांवरील अनधिकृत टपऱ्या व बांधकामांवर बुलडोझर चालवत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतल्याने शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
* जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमीनदोस्त :- पाटणकर चौक, महावीर गार्डन, बसस्टँड परिसर तसेच महामार्गांलगतच्या भागात नगर परिषदेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या टपऱ्या व अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याने प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता रस्ते मोकळे केले.
* नागरिकांना दिलासा, वाहतूक होणार सुलभ :- या कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकांनी नगर परिषदेच्या या धाडसी पावलाचे स्वागत केले असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान व्यक्त केले.
* कारवाईमागे लोकप्रतिनिधींचा पाठिंबा ? :- दरम्यान, या मोहिमेमागे स्थानिक लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. काही नागरिकांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई लोकप्रतिनिधींच्या संमतीशिवाय शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
* पुढील टप्प्यात आणखी कारवाईचे संकेत :- नगर परिषदेने ही मोहीम केवळ मुख्य चौकांपुरती मर्यादित न ठेवता पुढील टप्प्यात भाजी मार्केट रोड, मुख्य बाजारपेठ आणि शिळफाटा परिसरातही अतिक्रमण हटविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे इतर अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Social Plugin