* समतामूलक भारताचा संकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* महाड येथे भव्य कार्यक्रम ; ५५.८० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, सामाजिक न्यायाच्या उपक्रमांना गती
महाड / सचिन पवार :- महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करीत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त केला.
“डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.
* ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची भव्य सुरुवात :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड येथे या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते चवदार तळ्याच्या जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी मंजूर करण्यात आलेल्या ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान चवदार तळ्यावरील डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.
* समतेच्या लढ्याचा पुनरुच्चार :- मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, १९२३ मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला असला तरी त्याची अंमलबजावणी रोखली गेली. या अन्यायाविरुद्ध उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. “हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्धचा मानवतेचा लढा होता,” असे त्यांनी अधोरेखित केले.
* विकासकामांना गती :- चवदार तळ्याचा परिसर स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित करण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच, राज्य सरकार सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबातील ९८ वारसांना शासकीय नोकऱ्या, पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी निधी, चैत्यभूमी स्मारकाचे काम, लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी उपक्रम यांचा समावेश आहे. तसेच, बौद्धगया येथे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांच्या नावाने अध्यासन स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यशैलीत भाषण करत महाड येथे भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली. आमदार भरत गोगावले यांनी चवदार तळ्याच्या विकासासाठी मंजूर निधी शताब्दी वर्षापूर्वीच पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारण्याची मागणी केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रास्ताविकात या ऐतिहासिक स्थळाचा जागतिक स्तरावर विकास करण्याचा सरकारचा मानस असल्याचे स्पष्ट केले.
* देशातील पहिला उपक्रम :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील ९८ वारसांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्ती आदेश देण्यात आले. हा देशातील पहिला उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मंत्री आदिती तटकरे, डॉं. उदय सामंत, संजय शिरसाट, भरत गोगावले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, आमदार प्रवीण दरेकर तसेच विविध अधिकारी, सामाजिक संघटना आणि राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Social Plugin