* महाराष्ट्र पॅटर्नची देशभर दखल : बुलढाणा ते राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
* संघटन कौशल्य, उपक्रम आणि पंचसूत्री अंमलबजावणीचा गौरव
मुंबई / प्रतिनिधी :- पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM International Forum) च्या भारत देशाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल म्हस्के पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीची घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांनी अधिकृत पत्राद्वारे केली.मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात अनिल म्हस्के पाटील यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रात राबविलेल्या ‘बुलढाणा पॅटर्न’ आणि ‘महाराष्ट्र पॅटर्न’च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे संघटनेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.
* बुलढाणा ते भारत : प्रेरणादायी प्रवास :- अनिल म्हस्के पाटील यांचा गेल्या चार वर्षांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे. त्यांनी बुलढाणा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्याची सुरुवात केली. त्यानंतर विदर्भ विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण अध्यक्ष आणि पुढे महाराष्ट्राचे मुख्य अध्यक्ष अशी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
* ‘महाराष्ट्र पॅटर्न’ ठरला आदर्श :- महाराष्ट्रात पत्रकारांच्या संघटनात्मक बांधणीसाठी राबवलेले उपक्रम आणि ‘पंचसूत्री’ची प्रभावी अंमलबजावणी यामुळे ‘महाराष्ट्र पॅटर्न’ देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. तळागाळातील पत्रकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न मांडण्याचे आणि त्यावर काम करण्याचे मोठे काम म्हस्के यांनी आपल्या टीमसह केले आहे.
राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भावूक होत अनिल म्हस्के म्हणाले, "एका जिल्हाध्यक्षापासून सुरू झालेला प्रवास आज राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहोचला, याचे श्रेय संघटनेच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीला आणि सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमांना जाते. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने मला पत्रकारांच्या हितासाठी लढण्याची ताकद दिली. आगामी काळात ‘महाराष्ट्र पॅटर्न’ संपूर्ण देशभर राबवून पत्रकार कल्याणासाठी काम करणार आहे."
* नेतृत्वावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वास :- आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला यांनी सांगितले की, "अनिल म्हस्के यांचे संघटन कौशल्य आणि कामाची गती उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात त्यांनी तळागाळातील पत्रकारांना ज्या पद्धतीने एकत्र केले, त्यावरूनच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली."
'व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनीही शुभेच्छा देतांना म्हटले की, "अनिल म्हस्के म्हणजे कर्तृत्व आणि निष्ठेचा उत्तम संगम आहे. त्यांनी राबवलेली पंचसूत्री आणि संघटन उभारणीमुळे महाराष्ट्राचा डंका वाजत आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा आता देशभरातील पत्रकारांना होईल."
अनिल म्हस्के पाटील यांच्या निवडीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाटील यांच्या निवडीमुळे ‘महाराष्ट्र पॅटर्न’ला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळणार असून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत.


Social Plugin