* आमदार अनुभा मुंजारे व गौरवसिंह पारधी यांच्या हस्ते पूजन व प्रतिष्ठापना ; स्वातंत्र्यलढ्यातील बलिदानाची उजळणी
गुडरुघाट (नागपूर) / मिलिंद गाडेकर :- गुडरुघाट येथे वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण उत्साहात पार पडले. या सोहळ्याला बालाघाट विधानसभा क्षेत्राच्या आमदार श्रीमती अनुभा मुंजारे, आमदार गौरवसिंह पारधी तसेच आदिनाथ युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह ठाकुर यांच्या हस्ते विधिवत पूजन व प्रतिष्ठापना करण्यात आली.
रविवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व क्षत्रिय लोधी समाज बांधव उपस्थित होते. पारंपरिक विधी, पूजा-अर्चना आणि घोषणांनी परिसर देशभक्तीच्या वातावरणाने दुमदुमून गेला.
यावेळी बोलतांना आमदार अनुभा मुंजारे यांनी वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या शौर्याचा गौरव करतांना सांगितले की, 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध धैर्याने लढा देत देशरक्षणासाठी आपले बलिदान दिले. त्यांचे जीवन आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. राणी अवंतीबाई लोधी यांचे मूळ गाव मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मणकेडी असून त्यांचा विवाह रामगड संस्थानचे राजा विक्रमसिंह लोधी यांच्याशी झाला होता. पतीच्या निधनानंतरही त्यांनी खचून न जाता इंग्रजांविरुद्ध लढा सुरू ठेवत स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले.
या कार्यक्रमाला भाजप कामगार मोर्चाचे अध्यक्ष खेमराज दमाहे, जनपद पंचायत खैरलांजीचे उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद लिल्हारे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता बहेटवार, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार नागपुरे, सरपंच अनिल मस्करे (सावरगाव), सरपंच दिलीप बिसेन (गुडरुघाट) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष जितेंद्र लिल्हारे, सचिव थानसिंह मस्करे, कोषाध्यक्ष चैनलाल उपवंशी, संचालक श्रावणकुमार उपवंशी, ध्रुवसेन दशहरे आदींचा सहभाग लक्षणीय होता.
या अनावरण सोहळ्यामुळे क्षत्रिय लोधी समाजात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांच्या शौर्यगाथेची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Post a Comment
0 Comments