* गुन्हे शाखेची धडक कारवाई : 50 हजारांची चोरी उघड ; हद्दपार आरोपीसह विधीसंघर्ष बालक ताब्यात
पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा बसस्थानक परिसरात प्रवाशांना लक्ष्य करीत धाडसी चोरी करणाऱ्या अट्टल टोळीचा अखेर पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. हद्दपार आरोपीसह एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेत पोलिसांनी प्रभावी कारवाई करीत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
24 मार्च 2026 रोजी सुभाष विठ्ठल भावसार (वय 70, रा. उप्पलखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) हे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरी विक्री करून मिळालेली सुमारे 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांची रक्कम लंपास केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अंकुश मधुकर सुरवाडे (वय 19, रा. जळगाव) याला अटक केली. विशेष म्हणजे हा आरोपी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला असतानाही चोरीसाठी पाचोऱ्यात दाखल झाला होता. त्याच्यासोबत असलेल्या एका विधीसंघर्ष बालकालाही ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारच्या चोरीत त्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस कर्मचारी योगेश पाटील, संदीप राजपूत, हरीश परदेशी, गणेश कुवर तसेच होमगार्ड पंकज सोनवणे व अमोल गायकवाड यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ राहुल शिंपी करीत आहेत.
* नागरिकांना सतर्कतेचे आवाहन :- पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी रोख रक्कम व मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात, संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.


Post a Comment
0 Comments