* आदित्य युवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
* वॉर्ड क्रमांक 1 मधील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन इफ्तार साहित्य वितरण ; जात-धर्मापलीकडे माणुसकीचा संदेश
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने आदित्य युवा फाऊंडेशनच्या वतीने नगरदेवळा गावात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. 13 मार्च 2026 रोजी वॉर्ड क्रमांक 1 मधील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी जाऊन इफ्तार किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून समाजातील सर्व घटक आपलेच आहेत, ही भावना जपत माणुसकीचा सुंदर संदेश देण्यात आला.
या इफ्तार किटमध्ये शेव-चिवडा, जिलेबी, मूग भजी आणि कोल्ड्रिंक अशा खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला होता. रमजान हा त्याग, संयम आणि सेवेचा महिना मानला जातो. याच भावनेतून आदित्य युवा फाऊंडेशनने मुस्लिम बांधवांच्या आनंदात सहभागी होत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला.
या उपक्रमामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जात-धर्मापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “तुमची साथ, आमचा विश्वास… बदलू या समाजाचा प्रवास” या विचारातून प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी आदित्य युवा फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आदित्य परदेशी, उपाध्यक्ष तनवीर परदेशी, प्रमुख सदस्य निर्भय जगताप व फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच अदनान भाई, अनिस भाई, सलीम भाई यांच्यासह अनेक नवतरुण मुस्लिम बांधवांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी आदित्य युवा फाऊंडेशनच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमाचे नगरदेवळा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.


Social Plugin