Type Here to Get Search Results !

खोपोली, शिळफाटा व हाळ गावात रमजान ईद उत्साहात साजरी

* मस्जिदींमध्ये सामूहिक नमाज ; पोलिसांचा कडक बंदोबस्त व शुभेच्छांनी मिळवले नागरिकांचे कौतुक

खोपोली / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील खोपोली शहर, शिळफाटा परिसर तसेच हाळ गावात शनिवार, 21 मार्च 2026 रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी 7.30 ते 9 या वेळेत विविध मस्जिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली.

नमाज पूर्ण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. शहर आणि गावांमध्ये आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले.


ईदच्या पार्श्वभूमीवर खोपोली, शिळफाटा आणि हाळ गावात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, नमाज अदा करून बाहेर येणाऱ्या मुस्लिम बांधवांना तसेच लहान मुलांना पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


रमजान महिन्यातील 30 दिवसांचे कठोर रोजे, नमाज-ए-तरावीह आणि इबादतीनंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते. शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी करण्याचा आनंद सर्वत्र पसरला. ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी शांतता, सौहार्द आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली. यासोबतच गरीब व गरजू लोकांना सदका, फितरा, कपडे व इतर वस्तू देऊन मदत करण्यात आली.


ईदनिमित्त घरोघरी शिरखुर्मा, शेवया आणि विविध मिठाईचे पदार्थ बनविण्यात आले. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यात भेटीगाठी होत सणाचा आनंद द्विगुणित झाला. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी नवीन कपडे परिधान करून ईद साजरी केली. पहाटेपासूनच घरांची स्वच्छता, सजावट आणि सणाची तयारी करण्यात आली होती.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement