* लातूर जिल्हाधिकारी ते नागपूर स्मार्ट सिटी सीईओपर्यंतचा दमदार प्रवास
* ‘प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार’ विजेते अधिकारी आता VVMC च्या धुरीणपदी
वसई / नरेंद्र पाटील :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 2014 बॅचचे अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महानगरपालिकेच्या कारभारात अधिक गतिमानता आणि कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पृथ्वीराज बी.पी. हे शिस्तप्रिय, अभ्यासू आणि परिणामकारक कामकाजासाठी ओळखले जाणारे अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्रात विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करतांना आपली ठोस प्रशासकीय छाप उमटवली आहे. जिल्हा प्रशासन, ग्रामीण विकास आणि शहरी पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील त्यांचा अनुभव वसई-विरारसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
डिसेंबर 2020 ते जुलै 2023 या कालावधीत त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी जलसंधारण, शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला. विशेषतः कोरोना महामारीनंतर विस्कळीत झालेली प्रशासकीय व सामाजिक घडी पुन्हा सुरळीत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जुलै 2023 मध्ये त्यांची नियुक्ती नागपूर स्मार्ट सिटी (NSSCDCL) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली होती. या पदावर त्यांनी नागपूर शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरी सेवांचा दर्जा उंचावण्याचे काम केले.
यापूर्वी त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य करतांना ग्रामीण विकास, स्वच्छता अभियान आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यासाठी अनेक उपक्रम राबवले होते. पृथ्वीराज बी.पी. यांना ‘Prime Minister’s Award for Excellence in Public Administration’ हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा सन्मान देशातील सर्वोच्च प्रशासकीय गौरवांपैकी एक मानला जातो.
वसई-विरार महानगरपालिकेसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक आणि नागरी सेवा यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीराज बी. पी. यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments