* रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
* हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाची माहिती एका व्यासपीठावर, चार सत्रांतून तज्ज्ञांचे मार्गदर्शन
रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत “हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एप्रिल 2026 महिन्यात विशेष डिजिटल शेती शाळांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे हा आहे. या उपक्रमात कृषी विभागासोबत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग यांचा सहभाग आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल महिन्यात चार डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या सत्रांमध्ये तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार असून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
* शेती शाळांचे वेळापत्रक व विषय :-
🔹 1 एप्रिल 2026 : पेरणीपूर्व तंत्रज्ञान
(बेड तयार करणे, कमी मशागत, आंतरपीक पद्धत, बीजप्रक्रिया)
🔹 8 एप्रिल 2026 : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन
(बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा)
🔹 15 एप्रिल 2026 : एकात्मिक कीड व्यवस्थापन
(सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र कीटक संवर्धन)
🔹 22 एप्रिल 2026 : भात शेतीसाठी सुधारित तंत्रज्ञान
(DSR पद्धत, श्री पद्धत, यांत्रिकी लावणी)
* लाईव्ह प्रसारणाची सुविधा :- सर्व सत्रे सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केली जाणार आहेत.
* शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन :- या डिजिटल शेती शाळांमध्ये शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे, बीज उत्पादक तसेच वनपट्टेधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
* अधिकाऱ्यांचे आवाहन :- प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.


Post a Comment
0 Comments