* टीबी निर्मूलनासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
* डॉंक्टर - आरोग्य कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग
रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- जागतिक क्षयरोग दिनानिमित्त खारघर येथील मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये क्षयरोग (टीबी) विषयक कंटिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन (CME) सत्र उत्साहात पार पडले. HLFPPT व SSHAKTI प्रकल्पांतर्गत मेडिकोव्हर हॉस्पिटल आणि नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम (NTEP) यांच्या संयुक्त सहकार्याने, जिल्हा क्षयरोग केंद्र रायगड यांच्या समन्वयातून या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्रास पनवेलच्या सिटी टीबी ऑफिसर डॉं. उषा नाईक तसेच रायगडच्या जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉं. प्राची नेहुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. सुमारे 35 डॉंक्टर आणि रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी या सत्रात सहभागी झाले होते.
या सत्रात WHO सल्लागार डॉं. ज्योती सालवी यांनी ‘NTEP मार्गदर्शक तत्त्वे, औषध-प्रतिरोधक क्षयरोग (DR-TB) आणि क्षयरोग प्रतिबंधक उपचार (TPT)’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी टीबी नियंत्रणासाठी अद्ययावत उपचार पद्धती आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली.
HLFPPT चे रीजनल कोऑर्डिनेटर विकास कुरणे यांनी ‘NTEP अंतर्गत खासगी क्षेत्रासाठी क्षयरोग सेवा’ या विषयावर माहिती देताना खासगी डॉंक्टरांची महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी ‘निक्षय (Ni-kshay)’ प्लॅटफॉर्मचा वापर, वेळेत निदान आणि योग्य उपचाराचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी PPM कोऑर्डिनेटर सतीश यांनी ‘निक्षय मित्र’ उपक्रमाची माहिती देत टीबी रुग्णांना पोषण आणि सामाजिक आधार मिळण्यासाठी या योजनेचे महत्त्व सांगितले.
या सत्रातून टीबी निर्मूलनासाठी सरकारी आणि खासगी आरोग्य क्षेत्राने समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित झाली. उपस्थित डॉंक्टरांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सत्रांमुळे ज्ञानवृद्धी होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments