Type Here to Get Search Results !

भडगाव विधानसभा 2029 : निपाणेचे रावसाहेब पाटील होणार भडगांव विधानसभेचे आमदार ?


* आ. किशोर पाटील यांच्या सूचक विधानाने राजकीय चर्चांना उधाण

* नव्या विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीने समीकरणे बदलणार

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- भडगाव तालुक्याच्या राजकारणात आगामी 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाचोरा येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे नगरदेवळा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब मनोहर गिरधर पाटील यांच्या संभाव्य आमदारकीच्या दाव्याला बळ मिळाले आहे.

* ‘तयारीला लागा’ सूचक इशाऱ्याने वाढली उत्सुकता :- मेळाव्यात बोलतांना आ. किशोर पाटील यांनी आगामी मतदारसंघ पुनर्रचनेचा उल्लेख करीत भडगाव तालुका स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ म्हणून उदयास येईल, असे स्पष्ट संकेत दिले. याच वेळी त्यांनी “रावसाहेब पाटील यांनी तयारीला लागा” असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षपणे उमेदवारीचे संकेत दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


या एका वाक्यानेच भडगाव तालुक्यातील व नगरदेवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून रावसाहेब पाटील यांचे नाव आता आमदारकीसाठी सर्वाधिक चर्चेत आले आहे.


* 2029 मध्ये नवा मतदारसंघ :- मतदार यादी पुनर्निरीक्षणाचा डेटा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्याच्या पार्श्वभूमीवर, 2029 मध्ये भडगाव हा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे नगरदेवळा गाव या नव्या मतदारसंघात समाविष्ट होणार असल्याचे संकेत मिळत असून यामुळे या भागाचे राजकीय वजन वाढणार आहे.


* रावसाहेब पाटील : संघटनशक्तीचा मजबूत चेहरा :- शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून रावसाहेब पाटील यांनी भडगाव-पाचोरा परिसरात मजबूत संघटन उभारले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, विकासाभिमुख भूमिका आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे त्यांची प्रतिमा ‘ग्राउंड लेव्हल’वर मजबूत असल्याचे मानले जाते. यामुळेच नव्या मतदारसंघात ते शिवसेनेचा प्रमुख चेहरा ठरू शकतात, अशी चर्चा जोर धरत आहे.


* आ. किशोर पाटील यांचे राजकीय संकेत आणि आत्मविश्वास :- मेळाव्यात बोलतांना आ. किशोर पाटील यांनी स्वतःच्या मंत्रीपदाबाबतही आत्मविश्वास व्यक्त केला. “माझ्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी ही तुमची इच्छा आहे, तशी माझीही आहे, मात्र ती केव्हा पडेल हे वेळ ठरवेल,” असे त्यांनी सांगितले. तसेच चाळीसगाव उपजिल्हा कार्यालयास मान्यता मिळाल्याचे सांगत, पाचोरा-भडगाव तालुका त्यात समाविष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


* नगरदेवळा ‘किंगमेकर’ ठरणार ? :- नगरदेवळा गाव नव्या भडगाव मतदारसंघात समाविष्ट झाल्यास या भागाचे राजकीय महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वातून या भागातील अनेक प्रश्न सुटतील, अशी आशा स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.


राजकीय जाणकारांच्या मते, आ. किशोर पाटील यांनी केलेले वक्तव्य हे केवळ संकेत नसून एकप्रकारे ‘राजकीय घोषणा’च आहे. शिवसेना नव्या मतदारसंघात मजबूत उमेदवार देण्याच्या तयारीत असून रावसाहेब पाटील हे त्यासाठी सर्वात पुढे आहेत. संघटन, जनाधार आणि नेतृत्वगुण यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.


2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भडगाव तालुक्यात राजकीय हालचाली वेग घेत आहेत. नव्या मतदारसंघाच्या निर्मितीसोबतच नेतृत्वाचे नवीन चेहरे पुढे येत असून रावसाहेब पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. आता येणाऱ्या काळात पक्ष अधिकृत घोषणा करतो का, आणि विरोधक कोणती रणनीती आखतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement