* विश्रांती नगर (विसापूर) येथे नव्या शाखेची स्थापना
दापोली / रामदास धो. गमरे :- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विश्रांती नगर (विसापूर) येथे बौद्धजन पंचायत समितीच्या शाखा क्रमांक 21 चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद सकपाळ होते.
बौद्धजन पंचायत समिती ही मातृसंस्था 25 मे 1941 रोजी खार (पश्चिम) येथे दिवंगत गणपत कासारे (लाटवणकर) यांच्या निवासस्थानी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहमतीने स्थापन झाली होती. आज या संस्थेचा विस्तार महाराष्ट्रासह गोवा राज्यातही होत असून सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शाखाविस्ताराचे कार्य सुरू आहे.
या शाखेचे उद्घाटन मिरा-भाईंदर गट क्र. 33 चे प्रतिनिधी तसेच पंचायत समिती अर्थ समितीचे चिटणीस विलास तानु जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजेश गजानन पवार यांनी केले, तर बौद्धाचार्य सुभाष गौरू तांबे यांनी धार्मिक पठण विधी सादर केला.
यावेळी विलास जाधव यांनी प्रस्ताविक मांडताना संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्या शाखेला शुभेच्छा देत समाजकार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी शाखा क्र. 21 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी दिपक दशरथ पवार, उपाध्यक्षपदी संजय विश्वनाथ सकपाळ, चिटणीसपदी सतीश भागुराम सकपाळ, उपचिटणीसपदी सचिन सिताराम सकपाळ, खजिनदारपदी संतोष गंगाधर सकपाळ, संदेशवाहकपदी स्वप्निल मिलिंद सकपाळ तसेच आम्रपाली महिला संघाच्या अध्यक्षापदी दर्शनी रविंद्र पवार, उपाध्यक्षापदी निता नथुराम सकपाळ, चिटणीसपदी दिपिका अक्षय मर्चंडे, उपचिटणीसपदी संचिता संदेश सकपाळ, खजिनदारपदी जान्हवी संदीप पवार, संदेशवाहकपदी कांचनी हिरामण सकपाळ यांचा समावेश असून या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र, ओळखपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात मिलिंद सकपाळ यांनी पंचायत समितीच्या घटनेनुसार समाजहिताचे कार्य प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार व्यक्त केला. फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी राजेश पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment
0 Comments