* महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
* फ्यूज जाणे, डीओ निघणे सुरूच
* रात्री सेवेला कर्मचारी नसल्याने नागरिकांचा संताप
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील रंगारी गल्ली परिसरातील महावितरणच्या डीपी क्रमांक 386 मध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सतत फ्यूज जाणे, डीओ निघणे अशा समस्या निर्माण होत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या मते, डीपी क्रमांक 386 मध्ये दर काही दिवसांनी बिघाड होतो. कधी फ्यूज जातो, तर कधी डीओ निघतो. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा अचानक खंडित होतो आणि नागरिकांना तासन्तास अंधारात रहावे लागते. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात ही समस्या अधिक तीव्र होत आहे. महावितरणचा एकही कर्मचारी रात्री दुरुस्तीसाठी उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अनेक वेळा रात्रभर वीज येण्याची वाट पहावी लागते. यामुळे नागरिकांचा संयम सुटत असून “आता आम्हीच फ्यूज लावायला जावे का ?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या समस्येमुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अभियंता अधिकारी यांना या बाबीची माहिती असूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याचेही सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, महावितरणने या डीपीची तातडीने तपासणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. तसेच भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी योग्य देखभाल व नियमित तपासणी करावी, अशीही मागणी पुढे आली आहे. जर या समस्येकडे दुर्लक्ष कायम राहिले, तर ही बाब थेट ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.


Post a Comment
0 Comments