Type Here to Get Search Results !

नाशिक भोंदूगिरी प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा!

* अंनिसची मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

* अशोक खरात प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी

* महिलांच्या शोषणाविरोधात राज्यव्यापी उपाययोजना करण्याचा आग्रह

जळगांव / प्रतिनिधी :- नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी ठाम मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) जळगाव शहर शाखेने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे.

अंनिसने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अशोक खरात याने अध्यात्म, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केले असून हे प्रकरण केवळ गुन्हेगारी नसून सत्ता, संपत्ती आणि लैंगिक शोषणाचे गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे.


या प्रकरणाची चौकशी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाशिवाय विशेष तपास पथकाद्वारे (SIT) करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी अंनिसने केली आहे. तसेच आरोपीचे राजकीय व प्रशासकीय संबंध तपासून संबंधितांवरही कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.


‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, 2013’ ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि रखडलेली नियमावली तातडीने पूर्ण करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच फलज्योतिष, हस्तरेषाशास्त्र यांसारख्या माध्यमांचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांचाही कायद्यात समावेश करण्याची गरज अंनिसने व्यक्त केली आहे.


या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि आवश्यक सुरक्षा देण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. समाजात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी रोखण्यासाठी शासनाने शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असेही अंनिसने नमूद केले आहे.


भोंदूंशी राजकीय संबंध ठेवू नयेत यासाठी राजकीय पक्षांसाठी स्वतंत्र आचारसंहिता तयार करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन 27 मार्च रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी अंनिसचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे राज्य सहकार्यवाह विश्वजित चौधरी, शहर कार्याध्यक्ष मिनाक्षी चौधरी, राहुल बैसाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement