* CISF जवान बापू कोळी यांना वीरमरण
* पश्चिम बंगालमध्ये निवडणूक बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराचा झटका ; 24 वर्षांची निष्ठावंत देशसेवा संपली
पाचोरा / प्रतिनिधी :- पाचोरा तालुक्यातील लोहारी गावचे सुपुत्र आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले जवान बापू उखा कोळी (वय 44) यांचे कर्तव्य बजावत असतानाच दुःखद निधन झाले. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी गेले असतांना 27 मार्च रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचाराआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
नाशिक येथील नोट प्रेस युनिटमध्ये कार्यरत असलेल्या बापू कोळी यांची पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार नाशिकहून सुमारे 90 जवानांची तुकडी रेल्वेने जलपाईगुडीकडे रवाना झाली होती. प्रवासादरम्यान स्थानकाजवळ त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.
लहानपणापासून देशसेवेची जिद्द बाळगणाऱ्या बापू कोळी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत 2 ऑगस्ट 2002 रोजी CISF मध्ये प्रवेश मिळवला. तब्बल 24 वर्षे त्यांनी देशाच्या विविध भागांत प्रामाणिक व निष्ठावंत सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच लोहारी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली. सोमवारी (30 मार्च) त्यांच्या पार्थिवावर मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवयात्रेदरम्यान संपूर्ण गावाने आपल्या सुपुत्राला अश्रूपूर्ण निरोप दिला. त्यांचा मुलगा तन्मय बापू कोळी यांनी मुखाग्नी देत अंत्यसंस्कार विधी पार पाडला.
अंत्यसंस्कारावेळी माजी आमदार दिलीप वाघ, नगरसेवक सुमित किशोर पाटील, खासदार स्मिता वाघ यांच्या कन्या भैरवी वाघ पलांडे, तहसीलदार विजय बनसोडे, सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा, सरपंच रंजना पाटील, पोलिस पाटील विजय जोशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विश्वनाथ उगले यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments