* सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मान ; कोल्हापुरी हलगीच्या नादात रंगणार सोहळा
कोल्हापूर / प्रतिनिधी :- मंथन फाऊंडेशन, कपिलेश्वर यांच्या वतीने गुरूवार, 9 एप्रिल 2026 रोजी जिल्हास्तरीय भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘राजा राणीची गं जोडी’ या कार्यक्रमातून प्रसिद्धी मिळवलेले सिनेअभिनेता मोहन यांच्यासह सचिन काशिनाथ वाडकर आणि ज्योती सचिन वाडकर करणार आहेत. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, त्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, सुप्रसिद्ध व्याख्याता व निवेदिका सुषमा अरुण पाटील, शिवतेज केसरी पैलवान व युवा उद्योजक सचिन कदम, शिक्षणतज्ज्ञ प्रा. किसनराव विठ्ठलराव कुराडे तसेच लेखक, कवी व वकील विनोद मुसळे यांचा समावेश आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.
कार्यक्रमाला इस्पूर्ली पोलीस स्टेशनचे पीएसआय (PSI) रघुनाथ नलवडे, कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर, कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक अभिजीत शामराव खतकर तसेच महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉं. युवराज येडुरे, बाळासाहेब पाटील, सतीश गौड, प्रकाश खतकर, सुभाष भोसले, पांडुरंग बेलेकर, सचिन पवार, दत्तात्रय वारके, दिलीप शेटे, लखन कांबळे, खंडेराव देसाई, दत्तात्रय भेडवडेकर हेही विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
* कोल्हापुरी हलगीचा दमदार नाद :- या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे कोल्हापुरी हलगीचा दमदार नाद असणार आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत मिळणार असून उपस्थितांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9.30 वाजता प्रवेशाने होणार असून सकाळी 10 ते 11 दरम्यान प्रारंभिक कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर 11 वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व भाषणे होतील, तर दुपारी 12 ते 1 दरम्यान पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
* कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा संदेश :- मंथन फाऊंडेशनच्या या उपक्रमातून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणार आहे. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून, नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments