* राष्ट्रीय समितीची स्थापना : आग्रा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक
* 21 सदस्यीय कोअर कमिटी जाहीर, 26 एप्रिलला जंतर-मंतरवर धरणे आंदोलन
आग्रा / प्रतिनिधी :- बिहारमधील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला नवी दिशा देण्यासाठी आग्रा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बैठक पार पडली. विविध बौद्ध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी “महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्ती आंदोलन राष्ट्रीय समिती” स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, राष्ट्रीय बौद्ध महासभा तसेच महिला सशक्तीकरण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा येथील गौतम बुद्ध इंटर कॉलेज, ग्वालियर रोड येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. देशभरातून शंभरहून अधिक प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला.
सध्या बुद्ध गया येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी गेल्या 400 दिवसांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची पुढील दिशा आणि रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरली. आंदोलन अधिक संघटित आणि प्रभावी करण्यासाठी 21 सदस्यांची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. या कमिटीमध्ये आकाश लामा, भन्ते प्रज्ञाशील महाथेरो, डॉं. चंदकीती महाथेरो, भन्ते धम्मशिखर, भन्ते धम्मतप, भन्ते सुनीत पाल, डॉं. चंद्रबोधी पाटील, माजी आमदार धर्मप्रकाश भारतीय, आयु. सुनिल सारिपूत्त, ॲंड. प्रकाश दार्शनिक, आयु. शंकरराव ढेंगरे, आयु. विजय तांबे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
समितीच्या वतीने येत्या 26 एप्रिल रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यावर्षीची बुद्ध जयंती बुद्ध गया येथे मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचे ठरविण्यात आले आहे. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त देशभरातील जयंती उत्सव मंडळांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे बॅनर लावून जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.
या प्रकरणी 28 एप्रिल रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्या दिवशी भिक्खू संघाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही बैठकीत ठरविण्यात आले.


Post a Comment
0 Comments