* जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व क्षयरोग अधिकारी पदे रिक्त ; अतिरिक्त पदभारामुळे प्रशासनावर ताण
अलिबाग / प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या गंभीर अवस्थेत असून महत्त्वाची वरिष्ठ पदे दीर्घकाळापासून रिक्त असल्याने रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाणारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी ही तीनही पदे सध्या रिक्त आहेत. या पदांचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
* अतिरिक्त कार्यभारामुळे निर्णयप्रक्रिया मंदावली :- सध्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कार्यभार डॉं. निशीकांत पाटील यांच्याकडे आहे, तर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी या दोन्ही पदांचा कार्यभार सहाय्यक संचालक (कुष्ठरोग निर्मूलन) डॉं. प्राची नेहुलकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे प्रशासकीय निर्णय घेण्यात विलंब होत असून, त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर होत आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहण्याची शक्यता वाढली आहे.
* नियुक्ती न झाल्याने प्रश्नचिन्ह :- नियमित जिल्हा शल्य चिकित्सक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली झाल्यानंतरही त्या जागी नवीन नियुक्ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन अद्याप रायगड जिल्ह्यातूनच दिले जात असल्याची माहिती पुढे येत असून, या बाबीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
* रुग्णसेवेवर थेट परिणाम :- वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे आरोग्य योजनांची अंमलबजावणी, रुग्णालयांचे व्यवस्थापन, औषध पुरवठा आणि नियंत्रण यंत्रणा यावर परिणाम होत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
* तातडीच्या उपाययोजनांची गरज :- या पार्श्वभूमीवर रिक्त पदांवर तातडीने नियमित नियुक्त्या करणे, संबंधित प्रशासकीय बाबींची चौकशी करणे आणि जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या रायगडची आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments