* महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका
* ज्वारी-मका पिकांचे मोठे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली
बाळद (ता. पाचोरा) / दिलीप पाटील :- बाळद गावाजवळील शिवारात भरदुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकऱ्यांच्या ज्वारी व मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक उसळलेल्या अग्नीच्या ज्वाळा आणि आकाशाला भिडणारा धुराचा लोट पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, बाळद येथील शेतकरी संजय बागुल (गट नं. 32), संग्राम सोमवंशी (गट नं. 33), प्रतिभा पाटील (गट नं. 34) यांच्या शेतात अचानक आग लागली. संग्राम सोमवंशी यांच्या शेतातील डीपीवरील सबलाईनच्या तारा जमिनीपासून अवघ्या चार ते पाच फूट उंचीवर लोंबकळत होत्या. जोरदार वाऱ्यामुळे या तारा एकमेकांना लागून शॉर्टसर्किट झाले आणि त्यातूनच आगीची ठिणगी पडून ज्वारी पिकाला आग लागली. क्षणातच आग भडकली आणि शेजारील शेतांमध्ये पसरली.
या भीषण आगीत संजय बागुल यांच्या शेतातील मका पिकाचे नुकसान झाले तर संग्राम सोमवंशी यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे व प्रतिभा पाटील यांच्या शेतातील ज्वारी पिकाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय बांधालगत असलेल्या आंब्याच्या झाडालाही फटका बसला आहे. विशेष म्हणजे ही सर्व पिके काढणीच्या अवस्थेत होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच भडगाव येथील अग्निशामक दलाला तातडीने कळविण्यात आले. अवघ्या सात मिनिटांत अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवत मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या तत्परतेमुळे आग आणखी पसरली नाही आणि शेजारील शेतांचे नुकसान टळले.
या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शेताच्या मधोमध असलेल्या डीपीवरील तारांची अशी धोकादायक स्थिती असूनही कोणतीही दुरुस्ती न झाल्यानेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आगीत झालेले नुकसान मोठे असून संबंधित शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.


Post a Comment
0 Comments