* खालापूरमध्ये लाखो रुपयांची फसवणूक उघड
* महिलेसह तिघांना अटक, काही आरोपी फरार
रायगड / मानसी कांबळे :- खालापूर तालुक्यात गुंतवणुकीवर दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून काही मुख्य सूत्रधार अद्याप फरार असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
* सुसज्ज कार्यालयातून ‘हाय-प्रोफाइल’ फसवणूक :- गेल्या सहा महिन्यांपासून चौक व खालापूर परिसरात या फसवणुकीची कुजबुज सुरू होती. आरोपींनी चौक व खालापूर येथे आकर्षक आणि सुसज्ज कार्यालये उभारून स्थानिक व्यावसायिक, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘सावी कन्सल्टंट’ व इतर दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. थोड्याच अवधीत दुप्पट पैसे, आकर्षक व्याजदर आणि महागडी भेटवस्तू या आमिषामुळे अनेकांनी लाखोंची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला, ज्यामुळे अधिकाधिक लोक या जाळ्यात अडकले.
* विश्वासातून फसवणुकीत स्थानिकांचाच हात :- या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींमध्ये स्थानिक व्यक्तींचा सहभाग होता. “आपलेच लोक” असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला. गिफ्ट्स, आदरातिथ्य आणि सुरुवातीचा परतावा यामुळे अनेकांनी डोळेझाक करून पैसे गुंतवले. मात्र, कालांतराने परतावा थांबला, गिफ्ट्स बंद झाले आणि कार्यालयही सतत बंद राहू लागले. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संशय निर्माण झाला.
* गुंतवणूकदारांचा संताप अखेर पोलिसांत तक्रार :- सुरुवातीला कुणीही पोलिसात तक्रार करण्यास तयार नव्हते. मात्र फसवणुकीचे प्रमाण मोठे असल्याचे स्पष्ट होताच गुंतवणूकदार एकत्र आले. त्यानंतर खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 145 / 2026 दाखल करण्यात आला.
* महिलेसह तिघांना अटक, काही आरोपी फरार :- या प्रकरणी पोलिसांनी श्वेता प्रभू, पंकज शहा, देवेंद्र सरदार यांना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 316 (2), 316 (5), 318 (3), 3 (5) तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 (कलम 3, 4), बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019 (कलम 3, 4, 5, 21, 22, 23) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष मोरे करीत आहेत.
* खोट्या आमिषांना बळी पडू नका :- खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, दुप्पट-तिप्पट परताव्याच्या खोट्या आमिषांना बळी पडू नका. मेहनतीने कमावलेला पैसा सुरक्षित ठिकाणीच गुंतवा.”
* अजून मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता :- आपल्या कष्टाने, घाम गाळून कमविलेले पैसे याची अशी लालचेपोटी गुंतवणूक करणे निषेधार्थ आहे, अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणात काही प्रतिष्ठित व्यक्तींचाही सहभाग असल्याची चर्चा असून तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील काळात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Post a Comment
0 Comments