- नगरदेवळ्यात कार्यकर्ता मेळावा उत्साहात
- बोगस मतदानाच्या आरोपांनी राजकारण तापले
- आमदार षंडयंत्र करून निवडणुका जिंकतात
- नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदान
- माजी आमदार दिलीप वाघ यांचा आरोप
- मतदार संघात 1200 कोटींची कामे केली
- खासदार स्मिताताई वाघ यांची माहिती
- नगरदेवळ्यातून बदलाची सुरूवात करू या
- वैशालीताई सुर्यवंशी यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- भारतीय जनता पक्षाचा नगरदेवळा जिल्हा परिषद व पंचायत समिती गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. पक्षाच्या 46 व्या स्थापना दिनानिमित्त (6 एप्रिल 2026) आयोजित या मेळाव्यात आगामी नगरदेवळा ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, अवैध धंद्यांविरोधातील भूमिका आणि मतदार नोंदणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पाचोरा तालुकाध्यक्ष (नगरदेवळा मंडळ) गोविंद शेलार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांनी केले.
मेळाव्यास जळगांव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, भाजप उत्तर महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख शुभम शिंपी, युवा नेते प्रणय (मुन्ना भाऊ) भांडारकर, पाचोरा तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, सरचिटणीस शरद पाटील, माजी सभापती वसंत गायकवाड, माजी सभापती अनिल पाटील, विश्वनाथ सोमवंशी, शांताराम पाटील (बालू अण्णा), दिपक पाटील, नंदुबापू सुर्यवंशी, नगरदेवळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव भावडू पाटील, माजी उपसरपंच विलास भामरे, राजेंद्र भांडारकर, अलकाताई दिलीप भांडारकर आदींसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना स्थानिक नेतृत्वाने अवैध धंदे, विशेषतः वाळू माफियांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. कार्यकर्त्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश देण्यात आला.
* निवडणुकांतील गैरप्रकारांवर आरोप :- माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपल्या भाषणात काही निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. या संदर्भात सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी निवडणुकांमध्ये अधिक संघटितपणे लढत परिवर्तन घडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
* 1200 कोटींच्या विकासकामांची माहिती :- खासदार स्मिताताई वाघ यांनी मतदारसंघात सुमारे 1200 कोटी रुपयांची विकासकामे झाल्याची माहिती देत पाणीपुरवठा, ग्रामीण सुविधा आणि शेतीमाल वाहतुकीसाठी कार्गो प्रकल्प यावर भर दिला. तसेच, “बूथ बांधणी मजबूत करा, मतदार नोंदणीवर लक्ष द्या आणि SIR प्रक्रियेद्वारे बोगस मतदार रोखण्यासाठी काम करा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
* संघटन मजबूत करण्यावर भर :- भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करीत, “नगरदेवळ्यातून परिवर्तनाची सुरुवात करू या. स्थानिक पातळीवर एकजूट साधल्यास संपूर्ण मतदारसंघात बदल घडवता येईल,” असे सांगितले. तसेच, विश्वास आणि जनसंपर्काच्या बळावर काम करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
* बूथबांधणी व संघटनात्मक रणनीती :- भाजप तालुकाध्यक्ष गोविंद शेलार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत बूथनिहाय व शक्तीकेंद्रनिहाय बैठका सुरू करण्याचे निर्देश दिले. “एकजूट आणि समन्वयाशिवाय विरोधकांना प्रभावीपणे सामोरे जाता येणार नाही. ‘कमळ’ चिन्हावर एकसंघ लढा देणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली असून, “कमळ” चिन्हावर एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या भूमिकेतून पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, अशी प्रतिक्रिया आयोजक प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी, तर आभार प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांनी मानले.


Post a Comment
0 Comments