Type Here to Get Search Results !

माझ्या जिवाला काही झाल्यास ‘त्या’ दोघांना जबाबदार धरा!

* पत्रकार फिरोज पिंजारी यांची उच्चस्तरीय यंत्रणांना पूर्वसूचना

* राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायालये व पोलिस महासंचालकांकडे निवेदन

* नोंद व सुरक्षेच्या दृष्टीने उच्चस्तरीय यंत्रणांना पत्र पाठविल्याची प्रतिक्रिया 

मुंबई / मानसी कांबळे :- पत्रकारितेमुळे उद्भवलेल्या संभाव्य सुरक्षाधोक्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार फिरोज पिंजारी यांनी आपल्या जीवितास धोका असल्याची बाब देश व राज्यातील उच्चस्तरीय यंत्रणांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय तसेच राज्याचे पोलिस महासंचालक (DGP) यांना लेखी निवेदन पाठविल्याची माहिती समोर आली आहे. पिंजारी हे दै. कोकण प्रदेश न्यूज, दै. कोकण प्रजा, केपी न्यूज, देशवाणी न्यूजचे मुख्य संपादक असून विविध पत्रकार व सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

संपादक फिरोज पिंजारी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी स्थानिक पातळीवरील विकासकामे, प्रशासनातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचार यावर सातत्याने लेखन केले आहे. या लेखनामुळे काही व्यक्तींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातून स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


याच पार्श्वभूमीवर, “माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या जीवितास काहीही धोका निर्माण झाल्यास संबंधित दोन व्यक्तींना जबाबदार धरण्यात यावे,” अशी भूमिका त्यांनी पत्रातून मांडली आहे. तसेच, भविष्यात कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास संबंधितांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. संबधित पत्रात दोघांचे सहकारी लोकप्रतिनिधी, दोन बँक कर्मचारी अशा तब्बल दोन डझन जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. संबंधित नावे स्वतंत्ररीत्या सुरक्षित ठेवण्यात आल्याचेही सांगितले जात असून, आवश्यकतेनुसार ती संबंधित यंत्रणांसमोर सादर केली जाऊ शकतात.


संपादक पिंजारी यांनी पुढे नमूद केले आहे की, दबाव, धमक्या किंवा अप्रत्यक्ष इशारे यांची शक्यता नाकारता येत नसल्याने ही पूर्वसूचना देण्यात आली असून, ही तातडीच्या कारवाईपेक्षा नोंद व सुरक्षेच्या दृष्टीने दिलेली माहिती आहे.


दरम्यान, या पत्रामध्ये काही संबंधित व्यक्तींची नावे, त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख तसेच केंद्र व राज्य शासनाकडून 'त्या' दोघांसह नावे नमूद असलेल्यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी करण्यात आल्याचे समजते. तसेच, संभाव्य धोक्याच्या विविध स्वरूपांचा उल्लेख करीत भविष्यातील घटनांसाठी जबाबदारी निश्चित करण्याची विनंती करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे, संबंधित नावे स्वतंत्ररीत्या सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत असून कोणतीही घटना घडल्यास ती नावे शासन व न्यायालयासमोर सादर करण्यात यावीत, अशी सूचना पिंजारी यांनी आपल्या कायदेशीर सल्लागार व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जाते. यासोबतच, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनीही या प्रकरणाची दखल घेत स्वतंत्र पत्र पाठविल्याची माहिती मिळाली आहे.


समोरासमोरील विरोध, शिवीगाळ, धमकीला मी जुमानत नसल्याने ते आता साम, दाम, दंड, भेद या मार्गांचा अवलंब करू लागले आहेत. विविध मार्गांचा अवलंब करून ते मला किंवा माझ्या कुटुंबाला धोका निर्माण करू शकतात. माझ्यासोबत काम करणाऱ्या पत्रकार सहकारी यांना इजा पोहचविणे यासारखी कामे देखील 'ते' करू शकतात. तरी सदर पत्र हे तात्काळ कारवाईसाठी नसून भविष्यातील नोंदी व सुरक्षेच्या दृष्टीने पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रकारामुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, पत्रकारांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी पत्रकार संघटनांकडून होत आहे. तसेच, या निवेदनाची दखल घेऊन स्थानिक पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तरी या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया संबंधित प्रशासनाकडून आलेली नाही.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement