Type Here to Get Search Results !

कजगावजवळ भीषण अपघातात मोटरसायकल जळून खाक

* कार-मोटरसायकलची समोरासमोर धडक

* आगीचा भडका, धुरामुळे काही काळ वाहतूक ठप्प

कजगाव / प्रतिनिधी :- कजगाव-भडगाव मार्गांवरील कजगाव शिवारात कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून अपघातानंतर मोटरसायकलला आग लागून ती पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील चार जण कार (क्र. एमएच 01 सीएच 4260) ने कासोदा येथे लग्नसमारंभासाठी जात होते. याच वेळी पाचोरा येथून साकुरी (ता. मालेगाव) कडे जाणाऱ्या मोटरसायकलस्वाराशी त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की मोटरसायकलने क्षणात पेट घेतला. काही क्षणांतच मोटरसायकल आगीत भस्मसात झाली, तर मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. अपघातादरम्यान कारमधील एअरबॅग वेळेवर उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारमधील प्रवासी सुरक्षित राहिले असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.


अपघातानंतर मोटरसायकलला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर पसरला. त्यामुळे काही काळ वाहनचालकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच कजगाव पोलिस मदत केंद्राचे हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे, पोलिस पाटील राहुल पाटील तसेच भोरटेक येथील भाऊसाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणत जखमी तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे चाळीसगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement