Type Here to Get Search Results !

कोलमांडले येथे डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय

* बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत उभारणार प्रेरणास्थळ ; 48 गावांचा सामूहिक संकल्प

श्रीवर्धन / रामदास धो. गमरे :- श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावात डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत स्मारक उभारण्याचा संकल्प तब्बल 48 गावांतील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केला आहे.

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून सामाजिक क्रांतीची ठिणगी पेटवली. त्याच्या पूर्वसंध्येला, 24 डिसेंबर 1927 रोजी महाडकडे जात असतांना बाबासाहेब कोलमांडले येथे काही काळ वास्तव्यास होते. या ऐतिहासिक भेटीदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. त्यामुळे कोलमांडले ही भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मानली जाते.


या स्मारकाच्या माध्यमातून डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि मानवमुक्तीच्या विचारांचे जतन आणि प्रसार केला जाणार आहे. पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी दादर येथील वनमाळी सभागृहात झालेल्या जाहीर सभेत स्मारक उभारणीसाठी कार्यकारी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली.


या बैठकीत अध्यक्षपदी किशोर मोरे यांची निवड झाली असून उपाध्यक्ष म्हणून एस. के. खैरे, प्रदीप मोहिते, विद्यानंद पवार आणि संजय मोरे यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस म्हणून संजयकुमार खैरे, तर चिटणीस म्हणून संतोष तांबे, किरण जाधव आणि किशोर पवार यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी सुरेंद्र यादव यांची निवड झाली असून उपकोषाध्यक्ष म्हणून मनोहर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गत हिशोब तपासणीसाठी अरुण जाधव आणि मिलिंद तांबे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी सभासद म्हणून प्रा. संजय खैरे, संदीप जाधव, मिलिंद शिर्के, कुशानंद हळदे, संजय कुडवळकर, राजीव येलवे, शेखर कासारे आणि राहुल मोरे यांचा समावेश आहे.


नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्मारक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याची शपथ घेतली. सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील विविध घटकांचा सहभाग असल्यामुळे हा उपक्रम सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement