Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात मुलींसाठी अभ्यासिकेची सुरुवात !

* स्पर्धा परीक्षांच्या तयारीला मुलींना मिळाले हक्कांचे व्यासपीठ ; मुलींनी मानले आभार 

* महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधत ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका’ सुरू

* तहसिलदार विजय बनसोडे, सरपंच प्रतिक्षा काटकर यांची प्रमुख उपस्थिती

* शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचा पुढाकार

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावातील स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका’ सुरू करण्यात आली असून मुलींना आता अभ्यासासाठी स्वतंत्र व योग्य सुविधा उपलब्ध झाली आहेत.

महात्मा ज्योतीबा फुले जयंतीचे औचित्य साधत या अभ्यासिकेचे उद्घाटन पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे आणि नगरदेवळा सरपंच प्रतिक्षा किरण काटकर यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

* अभिलाषा रोकडे यांचा स्तुत्य पुढाकार :- नगरदेवळ्यातील तरुणींच्या अडचणींची दखल घेत शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनी स्वखर्च, स्वपरिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर ही अभ्यासिका सुरू केली. ‘दै. कोकण प्रदेश न्यूज’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीमुळे गावातील मुलींच्या संघर्षाची माहिती समोर आली होती. त्यानंतर अभिलाषा रोकडे यांनी तत्काळ पुढाकार घेत हा उपक्रम उभारला. या उपक्रमाला दिगर विकासो सोसायटी व मा. आ. दिलीप भाऊ वाघ युवा फाउंडेशन आदींचेही सहकार्य लाभले.


* मुलींना मिळाले अभ्यासाचे व्यासपीठ :- या अभ्यासिकेमुळे नगरदेवळ्यातील 70 ते 80 तरुणींना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा मिळाली आहे. पोलिस भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलींनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत आयोजकांचे आभार मानले.

* तहसीलदार बनसोडे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन :- यावेळी तहसीलदार विजय बनसोडे यांनी मुलींशी मनमोकळ्या गप्पा मारीत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा ही स्वतःशी असलेली स्पर्धा आहे. यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य दिशा आवश्यक आहे. मी स्वतः 17-18 तास अभ्यास करून इथपर्यंत पोहोचलो आहे. तसेच त्यांनी आगामी काळात मुलींना सखोल मार्गदर्शन करण्याचे आश्वासनही दिले.


या कार्यक्रमात सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर, प्रा. उमेश काटकर यांनीही मुलींना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच प्रतिक्षा काटकर व प्राचार्य किरण काटकर यांनी अभ्यासिकेसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आभार विकासो सोसायटीचे संचालक इंद्रनील भामरे यांनी मानले.


या प्रसंगी शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिलाषा रोकडे, डॉं. वैशाली अभय पाटील, विकासो सोसायटी संचालक तथा माजी ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र महाजन, संचालक इंद्रनील भामरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश देशमुख, निवृत्त पोस्टमन मुरलीधर महाजन, जेष्ठ पत्रकार प्रकाश जगताप, पत्रकार संजय सोनार, जितेंद्र परदेशी, रावसाहेब राऊळ, विश्वनाथ निकुंभ, हसीबूर शेख, ग्रामस्थ सुनील भामरे, रोहन दुसाने, स्वप्नील धिवरे, दगडू राजपूत, अभिजीत रोकडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मयुरी राजपूत, वैष्णवी बिरारी, दिपाली पाटील, दिव्या महाजन, राणी पाटील, कामिनी पाटील, प्रतिक्षा महाजन, सोनाली पवार, हर्षदा बिरारी, सानिया शेख, पूनम पवार, शुभांगी कोळी, सेजल पाटील, वैष्णवी शिंदे, उज्वला पाटील, मयुरी निकुंभ, शितल पाटील, हेमांगी पाटील, चेतना शिंपी, छाया गोसावी आदी तरुणी उपस्थित होत्या.

सावित्रीच्या लेकींच्या लढ्याला यश :- नगरदेवळा येथील स्पर्धा परीक्षा व पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींच्या संघर्षाला अखेर दिशा मिळाली आहे. 17 फेब्रुवारी 2026 रोजी ‘दै. कोकण प्रदेश न्यूज’मध्ये “सावित्रीच्या लेकींचा लढा : नगरदेवळ्यात 70-80 तरुणींचा वर्दीसाठी संघर्ष ; सुविधा नाहीत, तरीही स्वप्न जिवंत!” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत मुलींसाठी अभ्यासिकेची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्षा तसेच शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांनी पुढाकार घेत संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका’ सुरू केली आहे.


नगरदेवळा गावातील अनेक तरुणी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीत पोलिस भरती व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होत्या. अभ्यासासाठी स्वतंत्र जागा, आवश्यक सुविधा यांचा अभाव असूनही त्यांच्या जिद्दीने स्वप्न जिवंत ठेवले होते. या परिस्थितीची दखल घेत समाजातून सकारात्मक प्रतिसाद उमटला आणि अभ्यासिकेच्या स्वरूपात एक ठोस पाऊल उचलण्यात आले. 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका’ सुरू झाल्यामुळे आता या तरुणींना अभ्यासासाठी स्वतंत्र, शांत आणि सुसज्ज वातावरण उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. अभिलाषा रोकडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून मुलींनीही या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement