Type Here to Get Search Results !

सामाजिक समता सप्ताहानिमित्त 'मार्जिन मनी' कार्यशाळा उत्साहात संपन्न

* विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे

* समाज कल्याण विभागाचा संदेश

रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून देशात स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत राज्यभर 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येत आहे.  

या सप्ताहाचे औचित्य साधून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या वतीने अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) 'मार्जिन मनी' कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.

     

या कार्यशाळेत तरुण पिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रसाद लवटे यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या विविध संधींची ओळख करून दिली. त्यांनी केंद्र शासनाची 'स्टँडअप इंडिया' योजना आणि राज्य शासनाच्या 'मार्जिन मनी' योजनेबाबत सविस्तर माहिती देत, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन केले. तसेच औद्योगिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या 'व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजने'बाबतही सविस्तर अवगत केले.

    

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव, कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक प्रा. शैलेश जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेत संस्थेचे शिक्षक, कर्मचारी, समतादूत आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.    

     

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिते यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या उपक्रमामुळे आयटीआयमधील विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर उद्योजक बनण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय योजनांची आणि आर्थिक पाठबळाची माहिती एकाच छताखाली उपलब्ध झाली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement