Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथील पत्रकाराला शिवीगाळ करणाऱ्याचा 'आका' शोधा!

* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे राज्याचे गृह सचिव व पोलिस महासंचालक यांना भेटणार 

मुंबई / मानसी कांबळे : नगरदेवळा येथील पत्रकाराला धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाईसह या घटनेमागील ‘सूत्रधार’ शोधण्याची मागणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनने केली आहे.

* 'आका’ शोधण्याची मागणी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की, “पत्रकारांविरोधात झालेली ही घटना केवळ वैयक्तिक नसून यामागे मोठ्या स्तरावर कटकारस्थान असण्याची शक्यता आहे. शिवीगाळ करणाऱ्याला कोणी भडकवले ? कोणत्या पत्रकारांना लक्ष्य केले होते ? याचा सखोल तपास व्हावा.” तसेच, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून काही राजकीय व्यक्तींनी ही साजिश रचल्याची शक्यता व्यक्त करीत संबंधित ‘आका’चा शोध घेऊन त्यालाही अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.


* राज्य पातळीवर पाठपुरावा :- या प्रकरणी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी लवकरच राज्यपाल कार्यालय, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, तसेच पोलिस महासंचालक यांना निवेदन देणार आहेत. तसेच राज्याचे गृह सचिव आणि पोलिस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सत्य बाहेर आणण्याची मागणी करण्यात येणार आहे.


* 30 एप्रिलपर्यंत कारवाईची मुदत :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, 30 एप्रिल 2026 पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन सत्य समोर आले नाही, तर 1 मे 2026 "महाराष्ट्र दिना"पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनात पत्रकार खलील सुर्वे, फिरोज पिंजारी, जावेद शाह यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


* नेमकी घटना काय ? :- 29 मार्च 2026 रोजी “वृत्त प्रभात नगरदेवळा” या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी ग्रामपंचायत सदस्य विनोदसिंह परदेशी यांनी पत्रकारांविषयी बदनामीकारक मजकूर व ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी पत्रकार जावेद शाह यांनी संपर्क साधला असता, संबंधित व्यक्तीने नगरदेवळा येथील 'अशोक मेडिकल अँड जनरल स्टोअर्स' येथे येऊन शिवीगाळ करीत मारहाणीचा प्रयत्न केला व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे.


यानंतरही “पोलिसांना फोन का केला?” अशी विचारणा करीत पुन्हा धमक्या देण्यात आल्याचा आरोप आहे. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीनुसार हे कृत्य भारतीय न्याय संहिता (BNS-2023) अंतर्गत कलम 356 (मानहानी), कलम 351 (गुन्हेगारी धमकी) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66 व कलम 67 अन्वये दंडनीय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


* पत्रकार सुरक्षा पुन्हा चर्चेत :- या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून काहीजण पत्रकारांना धमकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप होत असून सोशल मीडियाचा गैरवापर आणि धमक्यांवर कठोर नियंत्रणाची गरज अधोरेखित झाली आहे. नगरदेवळा येथील ही घटना केवळ एका पत्रकारापुरती मर्यादित नसून संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आता पोलिस प्रशासन आणि शासन यावर कितपत ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement