भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्तेचा खेळ ; प्रश्न विचारणाऱ्यांविरुद्ध कारस्थानांचा डाव ?
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वी आपण “आटपाट नगर”ची कथा ऐकली होती. आज त्या कथेला एक नवे वळण मिळाले आहे. राजाची मानसिकता, वाढते टेन्शन आणि त्यातून जन्माला आलेल्या साजिशीची ही गोष्ट आहे.
आटपाट नगरचा राजा अनेक वर्षांपासून मनमानी कारभार करीत आला आहे. राज्य म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता, आणि प्रजा म्हणजे केवळ अनुयायी अशा वृत्तीने तो वावरत होता. दिल्ली - मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणांहून मिळालेली आर्थिक मदत, प्रजेच्या हक्कांवरील निर्णय, विकासकामांचा हिशोब या सर्व गोष्टींवर प्रश्न विचारणारे फारसे कोणी नव्हते. “हिशोब कोण विचारणार ?” या मानसिकतेनेच राजाचा कारभार पुढे चालला होता. पण एक दिवस एक नवयुवक पुढे आला. त्याने राजाच्या कामकाजावर थेट प्रश्न उपस्थित केले. प्रजेच्या हक्कांवर झालेले निर्णय, निधीचा वापर, अपारदर्शक व्यवहार या प्रश्नांनी राजाच्या सत्तेचा पाया हादरवला गेला. राजा आणि त्याच्या काकाश्रींना हे धक्कादायक ठरले, कारण पहिल्यांदाच कुणीतरी उघडपणे आवाज उठवित होता.
सुरुवातीला राजाने थेट संघर्षाचा मार्ग निवडला. दबाव, समेट, तह हे सारे प्रयत्न झाले. परंतु तहातील आश्वासने पूर्ण झाली नाहीत. नवयुवकाने पुन्हा आवाज उठविला. “सरीता स्वच्छ करा…राज्य सुजलाम् सुफलाम् करा…” पण बदल काहीच झाला नाही. तेव्हा राजाने मार्ग बदलला. समोरासमोर नव्हे, तर मागून वार करण्याचा.
राजाने आपल्या एका सेवकाला पुढे केले. योजना स्पष्ट होती. नवयुवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, धमक्या, दमदाटी, मानसिक दबाव निर्माण करणे. सांगितले जाते की, हे सर्व नियोजनपूर्वक घडवले गेले. आधुनिक माध्यमांचा वापर करून बदनामीची मोहीम उभारण्यात आली. भीतीचं वातावरण तयार करून आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला.
राजाला वाटले ही मोहीम यशस्वी झाली. पण कथा इथेच संपत नाही. नवयुवकाने स्पष्ट ठरवलं आहे की, “शंभर दिवस भीतीत जगण्यापेक्षा एक दिवस निर्भयपणे लढणे श्रेष्ठ!” तो आता अधिक सज्ज आहे. त्याचा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून तो सत्य, पारदर्शकता आणि न्यायासाठीचा लढा आहे.
राजा आणि काकाश्रींना कदाचित वाटत असेल की सत्ता सर्वकाही आहे. पण एक गोष्ट विसरता कामा नये, “जिनके घर शीशे के होते है, वे दूसरों के घरों पर पत्थर नहीं फेंकते.” इतिहास साक्षी आहे, सत्ता कितीही मोठी असली तरी कायद्यापेक्षा मोठी नाही. आजच्या काळात मंत्री, अधिकारी यांनाही भ्रष्टाचारासाठी तुरुंगवास भोगावा लागला आहे.
आटपाट नगरात सध्या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. एकीकडे सत्ता, साजिश आणि दबाव तर दुसरीकडे सत्य, धैर्य आणि प्रश्न विचारण्याची हिंमत...या लढ्याचा शेवट काय होईल, हे काळच ठरवेल…पण एक गोष्ट निश्चित...प्रश्न विचारणारी आवाजं कधीच संपत नाहीत.
(टीप : ही गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती, जागा, गाव, शहर, ग्राम पंचायत, नगर परिषद, नेत्याशी संबंध नाही...कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही...ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही वास्तव व्यक्ती / घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा"...ही गोष्ट 'दैनिक कोकण प्रदेश न्यूज'च्या वाचकांचे मनोरंजन करण्यासाठी काल्पनिक आहे, हे ध्यानात घ्यावे)
- फिरोज पिंजारी ( संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज, संस्थापक अध्यक्ष - न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, उपमुख्य पर्यवेक्षक - डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस) 8454886853.


Post a Comment
0 Comments