Type Here to Get Search Results !

सोनू निगम यांची कर्जत कृषी केंद्राला अनपेक्षित भेट

* किफायतशीर शेती, सुधारित भात जाती व कृषी यंत्रांबाबत घेतली सखोल माहिती ; कुटुंबीयांचाही उत्स्फूर्त सहभाग

कर्जत / प्रतिनिधी :- भारतातील लोकप्रिय पार्श्वगायक, संगीतकार आणि पद्मश्री सन्मानित सोनू निगम यांनी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला अचानक भेट देत शेतीविषयक तंत्रज्ञानाची सखोल माहिती जाणून घेतली. त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

या भेटीदरम्यान कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉं. रवींद्र मर्दाने यांनी डॉं. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या विविध सुधारित व संकरित जातींबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विविध फळपिके, मसाला पिके, कृषी यंत्रसामग्री आणि आधुनिक शेती पद्धतींची माहिती देण्यात आली. विशेषतः भात शेतीतील कष्ट कमी करणारे ड्रम सिडर आणि मनुष्यचलित लावणी यंत्र यांची माहिती ऐकून सोनू निगम विशेष प्रभावित झाल्याचे दिसून आले.


या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत पत्नी मधुरीमा निगम, मुलगा निवान तसेच जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे उपस्थित होते. कुटुंबीयांनीही शेतीविषयक माहिती जाणून घेण्यात उत्सुकता दाखवत विविध तंत्रज्ञानाबद्दल प्रश्न विचारले. येत्या हंगामात कर्जत परिसरातील त्यांच्या फॉर्महाऊसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या सुधारित वाणांचा वापर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात पुन्हा भेट देण्याचे आश्वासनही दिले.


या प्रसंगी डॉं. मर्दाने यांनी सोनू निगम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व काळीमिरीची कलमे भेट म्हणून प्रदान केली. सामाजिक कार्यकर्ते सोनू जगताप व मंदार म्हसे यांच्यासह उपस्थितांनी या भेटीचा आनंद लुटला.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement