* टोकनसाठी शेतकऱ्यांची पहाटेपासून रांग, संतापाचा उद्रेक
* नियोजनाचा अभाव, अव्यवस्था आणि चेअरमनवर आरोप
* हक्कासाठीही भटकंती का ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
भडगाव / निलेश महाले :- भडगाव शेतकी संघाचा कारभार पूर्णपणे ठप्प झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून नियोजनशून्य व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर उभे राहून आपल्या हक्कासाठी झुंज द्यावी लागत आहे. ज्वारी व मका खरेदीसाठी टोकन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटे चार वाजल्यापासून रांगा लावाव्या लागत आहेत. पहाटे येवून ही काम होत नसल्याने अनेकांना निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.
भडगाव - पाचोरा मार्गांवर शेकडो शेतकरी जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेला उभे राहत टोकनसाठी नंबर लावत असल्याचे चित्र दुसऱ्या दिवशी ही दिसून आले. सलग दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहिल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. कुठलीही शिस्त किंवा नियोजन नसल्याने संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गर्दी अनियंत्रित झाल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावावा लागला. ही बाबच शेतकी संघाच्या अपयशाची जिवंत साक्ष असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
या गोंधळात शेतकी संघाचे चेअरमन व संचालक मंडळ घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, संतप्त शेतकऱ्यांची गर्दी वाढताच त्यांनी जबाबदारी झटकून घटनास्थळ सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकारामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप अधिकच वाढला आहे.
उन्हात तासनतास उभ्या असलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांच्या भावना पूर्णपणे दुर्लक्षित केल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “रक्ताचे पाणी करून पिकवलेला माल विकायलाही आम्हाला अशी वागणूक का ?” असा जळजळीत सवाल उपस्थित करीत विद्यमान चेअरमनच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत होत असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जबाबदार अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व खरेदी प्रक्रियेत पारदर्शक व शिस्तबद्ध व्यवस्था उभी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गांने केली आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची ठाम मागणी
विद्यमान शेतकी संघ चेअरमन यांची संतप्त शेतकरी वर्गाकडून राजीनाम्याची मागणी होत आहे, तरी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करीत विद्यमान चेअरमन यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, खरेदी प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.



Post a Comment
0 Comments