मुंबई / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि बहुचर्चित अभिनेत्री भाजपा खासदार कंगना राणावत यांची कोलकाता ते मुंबई विमान प्रवासात भेट झाली.
ना. रामदास आठवले यांच्या शेजारच्या सीटवर कंगना राणावत होत्या. त्यामुळे या विमान प्रवासात दोघांमध्ये चर्चा रंगली. कंगना राणावत यांचा सन 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेशी वाद झाला होता. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाने कंगना राणावतची बाजू घेवून पाठिंबा दिला होता. त्याची आठवण कंगना राणावत यांनी ना. रामदास आठवले यांना सांगून त्यांचे आभार मानले. कंगना राणावत यांचे बांद्रा पाली हिल येथील ऑफिसचा काही भाग मुंबई महापालिकेने नियमबाह्य ठरवून तोडला होता. ती चुकीची कार्यवाही होती. त्या ऑफिसच्या तोडफोडीमुळे कंगना राणावत यांचे मोठे नुकसान झाले होते. ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांना यावेळी झालेल्या चर्चेत दिले.
कंगना राणावत यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय झालेले आहेत. सद्या त्या नविन चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. अभिनया सोबत त्यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातही प्रवेश केला आहे, अशी माहिती अभिनेत्री कंगना राणावत यांनी ना. रामदास आठवले यांना दिली.


Post a Comment
0 Comments